कागलमध्ये मातंग समाजात जाहीर सभा
कागल, दि. १७: गोरगरीब, उपेक्षित आणि वंचित जनतेसाठी संपूर्ण आयुष्यच खर्ची घातले. या जनतेनेच निधड्या छातीने माझी ढाल बनून सरक्षण केले, अशी कृतज्ञता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
कागलमध्ये मातंग समाज वसाहतीमध्ये आयोजित बांधकाम कामगारांना सुरक्ष साहित्य व शिष्यवृत्ती अनुदाना सह ओळखपत्रांचे वाटप अशा जाहीर सभेमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर होते.
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागल शहरातील मातंग वसाहतीसह झोपडपट्ट्यांपर्यंत घरकुल संकुलाची योजना पोहोचवली. रमाई आवास योजने मसह झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रभावीपणे राबविल्या. यातून गोरगरिबांचे जीवनमान उंचावण्यात यशस्वी झाल्याचे आत्मिक समाधान आहे, असेही ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, खरंतर गुन्हा समरजीत घाटगे यांच्यावरच दाखल करायला हवा. कारण; त्यांनी कागलच्या पवित्र प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा राजकीय खड्डा बनविला आहे. या मंदिराची पावित्र्य अबाधित आणि अखंड राखण्यासाठी मंदिर नगरपालिकेकडे वर्ग करण्यासाठीही प्रयत्न करणार आहोत.
माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांना छळणारे पुन्हा नव्याने विविध जाती-धर्मांमध्ये विष पेरत आहेत. राजर्षी शाहू महाराजांचा वारस म्हणून घेणाऱ्या समरजीत घाटगे यांना आमचे सांगणे आहे कि हे आता थांबवा.
तुषार सोनुले म्हणाले, ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ म्हणजे गोरगरिबांच्या झोपडीत जाऊन त्यांच्या सोबत चटणी-भाकर खाणारा त्यांचा सखा आहे. काही जातीय शक्ती मात्र नवनवे विषय घेऊन समाजात विद्वेष पसरवत आहेत.
रोमान्ना सोनुले म्हणाले, ज्या-ज्यावेळी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना जाती आणि धर्मावर आधारित विरोध झाला आहे, त्या- त्या वेळी सर्वसामान्य जनतेने अशा धर्मांध शक्तींचा सुपडासाफ केलेला आहे.
व्यासपीठावर श्रीमती छाया पांडुरंग सोनुले, सौ. जयश्री सोनुले, नगरसेवक सौरभ पाटील, नगरसेवक विवेक लोटे, संजय चितारी, गणेश सोनुले, प्रकाश कांबळे, गणेश मोरे, सतीश सोनुले, सुधाकर सोनुले, पॉल सोनुले, संजय सोनुले, शहाजी सोनुले आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत रणजीत साठे यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक सौरभ पाटील यांनी केले. आभार गणेश सोनुले यांनी मानले.