गटारीना पक्के कठडे बांधण्याची मागणी
कागल : कागल शहरातील रस्त्याच्या कोपऱ्यावरील खोल गटारी धोकादायक बनल्या असून, या कॉर्नर गटारींमुळे दुचाकीधारकांचे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. वाहनधारक समोरील गाडीस वाट देण्याच्या नादात संतुलन बिघडून या गटारीत पडत आहेत. यामुळे या गटारीना पक्के कठडे बांधण्याची मागणी नागरीकातून होत आहे.
कागल शहरात विशेषता पंचमुखी चौकातील शिवकृपा मेडिकल जवळच्या कॉर्नर गटार खूप धोकादायक बनली असून या तीव्र वळणार दुचाकी वाहनधारक समोरील गाडीस वाट देण्याच्या नादात संतुलन बिघडून या गटारीत पडत आहेत. कारण रस्त्यांची उंची वाढली असून त्यामानाने गटारीची खोली जास्त आहे. तसेच चारचाकी वाहनाचे देखील मागील चाक या वळणावर गटारीत जाऊन अपघात झाले आहेत.
अशीच परिस्थिती कागल मध्यवर्ती एसटी स्थानका समोरील उड्डाणपूला खालील दोन्ही बाजूकडील गटारींची आहे. मुळात या ठिकाणच्या दोन्ही बाजूकडील गटारी या खोल दरी बनल्या आहेत. रस्ते करताना गटारींच्या सेफ्टी प्रमाणकांकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरी या सर्व कोपऱ्या वरील गटारीना पक्के कठडे बांधण्याची मागणी नागरिक करत आहेत.