मुरगूड (शशी दरेकर) : महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील सर्वात मोठे बकऱ्यांच्या टकरीचे मैदान बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील कुन्नूर या गावात झाले. या ठिकाणी बिन दात, दोन दात, चार दात, सहा दात, आणि ओपन अशा गटांमध्ये टकरीच्या स्पर्धा संपन्न झाल्या .
यामध्ये ओपन गटासाठी थार गाडी बक्षीस ठेवण्यात आली होती.या मैदानामध्ये आपला बकरा खेळवण्याचे प्रत्येक बकरी मालकाचे स्वप्न असते या ठिकाणी दोन दाती गटामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुका येथील मुरगूडमधील अक्षय समाधान दरेकर यांच्या बकऱ्याने १०६ बकऱ्यांत प्रथम क्रमांक पटकावला त्यांना रोख रुपये व आकर्षक ढाल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातून प्रथमच या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारा अक्षय दरेकर यांचा बकरा ठरला आहे. इतक्या मोठ्या मैदानात आपल्या बकऱ्यांने नंबर घेतला व आपले स्वप्न पूर्ण केले असे म्हणत मालक अक्षय दरेकर यांना आनंदाश्रू रोखता आले नाही.
या मैदानामध्ये या बकऱ्याचे रायडर म्हणून कापशीचे विनायक शिंदे यांनी काम पाहिले व हा बकरा दोस्ती ग्रुप मुरगुड महाराष्ट्र या नावाने त्या ठिकाणी खेळवण्यात आला. मैदानात प्रथम क्रमांकाची घोषणा करताच एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे या बकऱ्या सोबत फोटो घेण्यासाठी अनेकांनी गर्दी केली . तसेच न्यूज व इंस्टाग्राम वाल्यांची सुद्धा गर्दी केली.

या दोस्ती ग्रुप मधील सदस्य योगेश दरेकर, सौरभ कडाकणे, ओंकार बरकाळे, गणेश डोंगरे, आकाश दरेकर, दीपक लोहार, दत्ता ढेंगे, बबन ठग, स्वप्निल अर्जुने, प्रकाश मेटकर यांनीही या ठिकाणी मोलाचे सहकार्य केले व प्रथम क्रमांक पटकावल्यावर उत्साहात जल्लोष साजरा केला. मुरगूडमध्ये घरी आल्यावर सुद्धा अक्षय दरेकर यांच्या घरच्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून बकऱ्याला ओवाळून औक्षण केले.