बोळावीच्या मध्यवस्तीत बनावट दारूचा कारखाना; २० लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोळावी (ता. कागल) गावाच्या मध्यवस्तीत सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा प्रकार उघडकीस आला आहे. गावाच्या मध्यवस्तीतच हा कारखाना सुरू असतानाही याची ग्रामस्थांना जराही कल्पना नव्हती. विशेष म्हणजे, परिसरात एका आलिशान बंगल्याचे बांधकाम सुरू असून, याच बंगल्याच्या तळघरात बनावट देशी दारू तयार करण्याचा उद्योग सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून समोर आले आहे.

Advertisements

मुरगूड पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) सायंकाळी छापा टाकून बनावट दारू निर्मितीचे साहित्य, स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, स्टिकर्स आणि चारचाकी वाहन असा एकूण २० लाख ३९ हजार २६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

बोळावी येथील जगदिश आप्पासो केसरकर यांच्या घरात बनावट देशी दारू तयार करण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. यावेळी जगदिश केसरकर, अविनाश केसरकर आणि मारुती माने हे तिघे मिळून आले. तसेच रुक्मिणी तोरसे या महिलेचाही या गुन्ह्यात समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

छाप्यामध्ये जी.एम. डॉक्टर, टँगो पंच आणि पहिली धार कृष्णा संत्र या ब्रँडच्या नावाने बनावट देशी दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. यामध्ये स्पिरीटने भरलेली २२० लिटर क्षमतेची १६ बॅरल, विविध प्रकारचे इसेन्स, दारूचे बॉक्स, हजारो रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, बनावट लेबल्स, टोपणे तसेच पॅकिंगसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

याशिवाय टोयोटा इनोव्हा चारचाकी वाहन, तीन मोबाईल फोन, मोटार आणि इतर साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २० लाख ३९ हजार २६ रुपये आहे.

एपीआय क्रांती पाटील, पीएसआय अनिकेत कुंडले आणि डी.बी. पथक मुरगूड पोलीस यांनी ही कारवाई केली. गावाच्या मध्यवस्तीत आणि सुरू असलेल्या आलिशान बंगल्याच्या तळघरात असा प्रकार सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम तसेच ट्रेडमार्क कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!