कागल : कागल पोलीस ठाणे आणि करवीर पोलीस ठाणे अंतर्गत घडलेले एकूण ३ चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात कागल पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ किलो वजनाची पितळी घंटा आणि दोन मोटारसायकली असा एकूण ४५,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मंदिरातील घंटा चोरीचा गुन्हा उघड
दिनांक १५/०६/२०२६ रोजी सायंकाळी ४:०० वाजण्याच्या सुमारास सिद्धनेर्ली गावातील सिद्धेश्वर मंदिरातील पुजारी मंदिराची साफसफाई करण्यासाठी गेले असता, मंदिराच्या मधोमध बांधलेली १५ किलो वजनाची पितळी घंटा चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी अज्ञात चोराविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींना पडकले
वरिष्ठांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक श्री. गंगाधर घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ३ ते ४ दिवस सतत तपास केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केल्यानंतर, संशयित आरोपी दीपक उर्फ सागर संदिप चव्हाण (वय २५) आणि त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली.
दिनांक २१/०६/२०२६ रोजी पोलिसांनी बेघर वसाहत, कागल येथे सापळा रचून खालील तीन आरोपींना ताब्यात घेतले:
१. दीपक उर्फ सागर संदिप चव्हाण (वय २५, रा. बेघर वसाहत, कागल, मूळ रा. सैराट चौक, तामगाव, करवीर)
२. राम उर्फ लखन हिंदुराव गायकवाड (वय ३८, रा. बिरदेव मंदिर, गडमुडशिंगी, करवीर)
३. संदिप बंडु चव्हाण (वय ४६, रा. बेघर वसाहत, कागल, मूळ रा. सैराट चौक, तामगाव, करवीर)
आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ किलो वजनाची पितळी घंटा आणि इतर दोन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.