कागल : कागल नगरपरिषदेमार्फत नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, सुलभ, जलद व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘आपले सरकार नागरी सेवा केंद्र’ आज शुभारंभ करण्यात आला.
या प्रसंगी, मा.नगराध्यक्षासो सविता माने, मा.उपनगराध्यक्षसो जयवंत रावण, मा. मुख्याधिकारीसो अजय पाटणकर,मा. पाणीपुरवठा विभाग सभापतीसो प्रकाश गाडेकर, मा. आरोग्य विभाग सभापतीसो प्रवीण काळबर, मा.शिक्षण विभाग सभापतीसो अरुण गुरव, मा. महिला बालकल्याण विभाग सभापतीसो सारिका बारड, पक्षप्रतोद श्री.सतीश घाटगे,श्री.दिपक मगर व सर्व नगरसेवक/नगरसेविका,अधिकारी व कर्मचारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते सेवा केंद्राशी संबंधित अधिकृत प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

या नव्याने सुरू झालेल्या सेवा केंद्रामार्फत उत्पन्न दाखला, डोमिसाईल दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, EWS प्रमाणपत्र, मराठा (SEBC) प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, बायोमेट्रिक अपडेट, गॅझेट नाव बदल, जात पडताळणी, पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, केंद्रीय OBC/SEBC/VJNT प्रमाणपत्र तसेच इतर विविध शासकीय दाखले नागरिकांना शासकीय दरात उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना या सेवा केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले असून, “आपली सेवा… आमची जबाबदारी…” या ब्रीदवाक्यानुसार नागरिकांना दर्जेदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमामुळे नागरिकांची विविध शासकीय कामांसाठी होणारी धावपळ कमी होऊन, अनेक महत्त्वाच्या सेवा आता एकाच छताखाली उपलब्ध होणार असल्याने नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.