सिद्धनेर्ली (श्रध्दा सुर्वे ) : गेली दोन दिवसांच्या उष्णते नंतर अचानक आलेल्या वादळी पावसाने सुमारे अर्धा तास सिद्धनेर्ली परिसराला चांगलेच झोडपून काढले. यामुळे सिद्धनेर्ली परिसरातील अनेक जणांचे नुकसान झाले.अनेक ठिकाणी घराची कवले, पत्रे उडून गेली असून शेतकऱ्यांच्या गवताच्या गंजी देखील या वादळी पावसात उडून जाऊन नुकसान झाले. अचानक आलेल्या वादळी पावसामुळे ग्रामस्थांची चांगलीच दैना झाली, महिलांनी महिना दोन महिन्याच्या कष्टाने तयार करून तयार ठेवलेल्या शेणी,सरपण ही पावसात भिजून गेले आहे.
अचानक आलेल्या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे देखील मोडून पडली.कागल मूरगुड रोड वरती पिंपळगाव नजीक मोठं मोठी झाडे रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूकीची कोडी झाली. या वादळी पावसाने पिंपळगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक पोल्ट्री धारकाचे वादळी वाऱ्याने शेडचे मोठे नुकसान झाले आहे तर पिंपळगाव येथील सामाजिक वनीकरण मधील सुमारे 30 ते 40 झाडे उनमुळून पडली आहेत.काही ठिकाणी विद्युत पोलचे देखील मोठे नुकसान झाले आहे. रोड वरती लावलेल्या गाड्या वरती देखील झाडे मोडून पडल्याने गाड्याचे मोठं नुकसान झाले.