गॅरेज फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या मुसक्या आवळल्या

७.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुरगूड येथील जनता गॅरेज फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला मुरगूड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Advertisements

मुरगूड परिसरातील ‘जनता गॅरेज’ फोडून तसेच गॅरेजसमोर उभ्या असलेल्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.

Advertisements

अटक केलेल्या आरोपीचे नाव सुरज नागेश पाटील (वय २६) असे असून, तो मूळचा हडलगाव (तालुका हुकेरी, जिल्हा बेळगाव) येथील आहे आणि सध्या गारगोटी (तालुका भुदरगड) येथे वास्तव्यास आहे.

मुरगूड पोलीस ठाण्यातील पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, पांगिरे फाटा येथे एक इसम चोरीच्या बॅटऱ्या विक्रीसाठी येणार आहे.

Advertisements

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुरज पाटील याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने जनता गॅरेजमधून ११ बॅटऱ्या, ४ टायर, इलेक्ट्रिक गन आणि ट्रकमधून २०० लिटर डिझेल चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपीकडून चोरीचा माल आणि गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्हा मोटारसायकल व टाटा इंट्रा टेम्पो असा एकूण ७ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सुरज पाटील हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गडहिंग्लज पोलीस ठाण्यात डिझेल चोरीचा गुन्हा दाखल आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली असून, आरोपीकडे अधिक तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!