मुरगुड शहर जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन उत्साहात; अनेक जेष्ठांचा सन्मान
मुरगूड ( शशी दरेकर ) : ज्येष्ठांना आनंददायी आयुष्य लाभावे यासाठी मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघ करत असलेले कार्य आदर्शवत व प्रेरणादायी असून संघाच्या प्रगतीसाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.असे प्रतिपादन शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष व बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी केले .
३३ व्या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त मुरगुड शहर ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षस्थानी मुरगुड चे माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेडके होते.
प्रवीणसिंह पाटील म्हणाले, ” ज्येष्ठांचा मान सन्मान कुटुंबाने ठेवणे गरजेचे आहे. मात्र दुर्दैवाने अनेक कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र ज्येष्ठांना त्यांचे आयुष्य आनंददायी व आरोग्यपूर्ण जावे यासाठी जेष्ठ नागरिक संघाच्या विरंगुळा केंद्राने घेतलेली भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे.त्यांच्या आनंदासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली.
माजी नगराध्यक्ष मेंडके म्हणाले , ” आपल्या कार्यकाळात ज्येष्ठांना पालिकेची कायमस्वरूपी जागा दिल्याचे पुण्य आम्हाला मिळाले.ज्येष्ठांचा आदर , सत्कार व मान राखत त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबवणारा मुरगूडचा ज्येष्ठ नागरिक संघ तरुणांना प्रेरणादायी आहे.”
संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे यांनी जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व , मुरगूडच्या जेष्ठ नागरिक संघाची १४ वर्षाची वाटचाल उलगडत राज्यातील ग्रंथालयांच्या धरतीवर ज्येष्ठ नागरिक संघाना ५० हजाराचे अनुदान सरकारने द्यावे. ज्येष्ठाना किमान ५ हजार पेन्शन द्यावी व शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठांना ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्यत्व देण्याची सक्ती करावी अशा मागण्या केल्या. यावेळी माजी मुख्याध्यापक पी.व्ही. पाटील व माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या वसंत निकम ,पी.व्ही. पाटील,आण्णासो परीट, दादू बरकाळे, सिकंदर जमादार, श्रीकांत सुतार , निवृत्ती वंडकर ( गुरुजी ) , शिवाजी कांबळे व सौ शकुंतला गंगापूरे यांचा सत्कार करण्यात आला. तर सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या अकरा सदस्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रवीणसिंह पाटील यांनी संघास एक कॅरम सेट भेट दिला.
कार्यक्रमास सुमारे १५० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. स्वागत माजी मुख्याध्यापक अशोक डवरी यांनी केले. आभार एम.टी. सामंत यांनी मानले. सूत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले.