प्रशासनाला आता तरी जाग येणार का ? नागरिकांतून संताप व्यक्त
कागल तालुक्यातील यमगे मुरगुड दरम्यान खराब रस्त्यामुळे गर्भवती असणाऱ्या एका ऊसतोड मजूर महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना घडली. निपाणी फोंडा – राज्यमार्गावर खराब रस्तामुळे प्रवासादरम्यान महिलेच्या पोटात दुखायला लागले. तिला प्रसुती कळा सुरु झाल्य
यमगे येथील प्राथमिक केंद्रातील आशासेविका सरिता धनाजी एकल यांना ही घटना सांगितली. काही वेळात डॉ. रुपाली लोकरे, आशासेविक सरिता एकल सुनीता पाटील, सुनीता कांबळे यांनी धाव घेऊन उपचार केले. त्यामुळे बाळ आणि आई किरण केस पालवी (रा. खारी, ता. खालवा, जिल्हा खांडवा, मध्य प्रदेश) या सुखरूप आहेत. रयत साखर कारखान्याकडे ३२ मजूर ऊस तोडणीचे काम करतात. त्यांचे सध्या कासेगावात वास्तव्य आहे.
शुक्रवारी सायंकाळी मजूर तिरवडे (ता. भुदरगड) च्या दिशेने निघाले होते. रात्री साडे अकरा वाजता कोल्हापूर नजीक त्यांनी मुक्काम केला. सकाळी तेथून ही सर्व मंडळी नऊच्या सुमारास यमगेजवळ आल्यानंतर प्रवासादरम्यान महिलेच्या पोटात दुखायला लागले. खराब रस्त्यामुळे तिला प्रसुती कळा सुरु झाल्या. महिलेला त्रास होत असल्याचे समजताच तातडीने ट्रॅक्टर मालक सुरज नांदेकर यांनी १०८ रुग्णवाहिकेस बोलावलं. तत्पूर्वी सेनापती कापशीमधून रुग्णवाहिका दाखल होण्यापूर्वीच रस्त्याकडेला शेतामध्ये काही महिलांनी आडोसा निर्माण केला आणि किरण पालवी या महिलेने आपल्या बाळाला जन्म दिला.
दरम्यान, यमगे गावातील आशा स्वयंसेविकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन महिलेला रुग्णालयाकडे पाठवण्यास मदत केली. फोंडा – निपाणी राज्यमार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणावर खड्ड्याचे साम्राज्य आहे.. अशा मार्गावरूनच ही गर्भवती महिला ट्रॅक्टर मधून प्रवास करत होती. खड्डेमय रस्त्यामुळे महिलेच्या पोटात दुखण्यास सुरू झाले. तत्काळ मदत मिळाली. नाहीतर या खराब रस्त्यामुळे बाळ-बाळंतणीचा जीवही गेला असता. आता तरी प्रशासनाने जागे व्हावे, असा संताप नागरिकांतून व्यक्त केला जातोय.