बटाटेवडा, डोसा, मिसळ बनणार यंत्राद्वारे
पिंपळगाव खुर्द (आण्णाप्पा मगदूम) : उद्योगधंदा करण्यासाठी मनुष्यबळाची खूप गरज असते आणि उद्योगासाठी मनुष्यबळाची टंचाई भासत आहे. जास्त मनुष्यबळाची गरज भासणार नाही याचाच विचार करुन सिद्धनेर्ली येथील रणवीर पाटील या युवा उद्योजकांने या टंचाईवर मार्ग शोधून बटाटेवडा, मिसळ, लोणी डोसा व चहा तयार करण्याचे यंत्र निर्माण केले आहे. ही सर्व यंत्रे वीजेवर चालणारी असून उपहारगृहात विना आचारी याचा वापर केला जाणार आहे. मनुष्यबळावर अवलंबून राहू नये म्हणून पाटील यांनी स्वत: ही यंत्रे विकसित केली आहेत.
पारंपारीक पद्धतीपेक्षा कमी वेळात, कमी तेलात हा वडा तयार होईल. एक लिटर तेलात 60 वडे तयार होतात तर पाटील यांनी बनविलेल्या यंत्रात 86 वडे तयार होतील ते ही लहान व मोठ्या आकारामध्ये त्याचबरोबर अगदी दोन मिनिटाच्या कालावधीमध्ये तयार होणारे लोणी डोसा चे यंत्र देखील विकसित केले आहे. शिवाय मिसळ व चहा बनणार्या यंत्रामध्ये अगदी कमी वेळेत 150 कप चहा व सत्तर मिसळची सोय होणार आहे. पाटील यांनी सर्व पदार्थांच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यामुळे लवकरच कागल-मुरगूड राज्यमार्गवर सिद्धनेर्लीनजीक विना आचारी उपहारगृहाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यांनी बनविलेली यंत्रे ही लाईट गेल्यानंतर दोन तास बॅटरी बॅकअप वर चालतील अशा पद्धतीची बनविलेली आहेत. तसेच गंजप्रतिरोधक साहित्य वापरल्याने उष्णता, तेल, पाण्यामुळे यंत्रे खराब होणार नाहीत याचीही त्यांनी दक्षता घेतली आहेत. यंत्र निर्मितीसाठी रत्नाकर पाटील, प्राजक्ता पाटील, विनायक पाटील, ऋषिकेश पाटील, विनायक संकपाळ, संकेत पाटील यांची मदत होत आहे.