कागल(विक्रांत कोरे) : शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या बालकाच्या अंगावर भटक्या कुत्र्याने हल्ला चढविला. चार- पाच ठिकाणी चावा घेतल्याने बालक गंभीर जखमी झाले आहे. हा प्रकार सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास करनूर ता. कागल येथील रामकृष्णनगर वसाहतीमधील प्राथमिक शाळेच्या आवारात घडला. कुत्र्याच्या हल्ल्याने संपूर्ण रामकृष्णनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.कु. साईराज संदीप पाटील वय वर्ष 6 असे त्या जखमी बालकाचे नाव आहे.
जखमी बालकावर कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साईराज हा बालक सकाळी शाळेच्या पटांगणात खेळत होता. खेळता- खेळता बालकाने कुत्रीच्या पिल्लांच्या अंगावर छोटासा दगड मारला. बाजूलाच कुत्री होती. त्या कुत्रीने या बालकाच्या अंगावर हल्ला चढविला. दोन्ही पायाच्या पिढऱ्या, ढुंगण आधी भागावर चार ते पाच ठिकाणी चावा घेतला. भयभीत पालकांनी त्याला जखमी अवस्थेत घेऊन क. सांगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. तेथे प्राथमिक उपचार करून त्यास कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात नेले.