गुन्हेगारी का वाढते आणि गुन्हेगारांना समाजात का प्रतिष्ठा मिळते याचा विचार करण्याची सध्या वेळ आली आहे. गुन्हेगारांना राजकीय पक्षात प्रतिष्ठेचे स्थान मिळताना दिसते. सध्याच्या काळात राजकारणात, धर्मकारणात गुन्हेगार सर्वत्र दिसतात. या गुन्हेगारांना प्रचंड पैसा पुरवला जातो. त्यामुळे राज्य कायद्याचे आणि न्यायाचे हवे असे वाटत असताना कायदा पाळणाऱ्यापेक्षा कायदा मोडणाऱ्या प्रवृत्ती जास्त दिसतात.
देशात काही पक्षांनी तर स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुका जिंकण्यासाठी गुन्हेगारी करणाऱ्या लोकांना पाळलेले दिसते. ते गुंड निवडणुका आल्या की समाजात शांतता असताना स्वतःचा पैसा पुरवठा करणाऱ्या मालकाच्या पक्षाला फायदा व्हावा या हेतूने समाजात अराजकता माजवतात. पुढील वर्षी देशातील लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे महाराष्ट्रात सध्या काही शहरात दंगली झाल्या तर काही शहरात दंगली होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूर सारख्या पुरोगामी शहरात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात असताना या ठिकाणी जाणून-बुजून दंगल घडवण्यात आली.
राजर्षीं छत्रपती शाहू महाराज वास्तव्य करीत असलेल्या या नगरीला काळीमा लागला. हा कोल्हापूरच्या जनतेचा अपमान आहे. दंगल घडवणाऱ्या व शहरात दहशत पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा शोध घेण्याचे पोलीस खाते काम करीत आहे. दंगलीच्या पाठीमागे कुणाचा हात आहे आणि कुणाचा स्वार्थ आहे हे पोलीस लवकरच बाहेर काढतील. आजचे दंगल घडवणारे गुंड मामुली स्वरूपाचे नाहीत तर ते माणुसकीला काळीमा फासणारे आहेत.
सध्या दंगल करणारे गुंड प्रतिष्ठित व धर्मनिष्ठ आहेत. ते दंगल करताना समाजाची संपत्ती लुटतात. घरे जाळतात. नासधूस करतात. ठराविक एखाद्या समूहाचीच लूट करीत असतील तर ते वाईट आहे. या कृतीच्या पाठीमागे निश्चित स्वार्थ असतो. दहशत निर्माण करतानाही गुंड महिलांच्यावरही अन्याय करतात. काही गुंडाना आम्ही हे जे करतो ते धर्मासाठी करतो असे वाटते. हे चुकीचे आहे. कारण गुंडांना धर्म नसतो.
अनेक शहरात दंगली झालेल्या पाहून कॉमन मॅन अस्वस्थ झालेला दिसतो. तो असुरक्षित आहे. त्यामुळे आजची स्थिती फार वाईट व भीषण आहे. सज्जनांनी धर्माचे पालन करावे त्यानुसार धर्माचे आचरणही करावे पण धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी गुंडांच्याकडे नको. धार्मिक दंगलीने समाजाचे मोठे नुकसान होते. समाजातील माणसे एकमेकांकडे संशयाने पाहतात. आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरात सर्वांनी एकमेकांबरोबर गुण्यागोविंदाने राहिले पाहिजे. दंगलीमध्ये छोटे-मोठे व्यापारी, हातगाडीवाले, छोटे टपरीवाले, भाजी विकणारे, रस्त्यावर बसणारे छोटे व्यापारी यांचे जास्त नुकसान होते. त्यांचे संसार देशोधडीला लागतात. त्यांच्या कुटुंबाचे फार हाल होतात. त्यांची मुलेबाळे उघड्यावर पडतात.
या गुंडगिरीची लोण आज शाळा, कॉलेजपर्यंत पोहोचलेले दिसते. विशेषता शहरातील शाळा, कॉलेजमध्ये श्रीमंत असणारी मुले आपले वर्चस्व दाखवण्यासाठी सामूहिक टोळके करून गोरगरीब, अभ्यासू मुलांच्यावर आपला प्रभाव पाडतात. कॉलेजमध्ये शिक्षणापेक्षा धुडकूस घालून चमकेगीरी करण्याचा प्रयत्न करतात. ही लाडात वाढवलेली व पैशाची मस्ती असलेली मुले प्राचार्य किंवा प्राध्यापक यांनाही दाद देत नाहीत. एकंदरीत शाळा, कॉलेजचे शैक्षणिक वातावरण फार बिघडून टाकतात. हा दांडगाही करणारा वर्ग अनैतिकतेतून मिळालेल्या पैसेवाल्या घराण्यातून आलेला असतो. या प्रवृत्तीचा राजकारणातीही प्रभाव असतो. त्यामुळे पोलीस खातेही यांचे काही वाकडे करू शकत नाही.
या सुशिक्षित टोळक्याचा सर्वत्र वावर असतो. आगगाडीत, बसमध्ये, सिनेमागृहात, बाजारात, रस्त्यावर या सुशिक्षित टोळक्याचा फार त्रास असतो. या टोळक्याची भीती सज्जनांना व महिलांना फार असते. हे सुशिक्षित टोळके समाजात कोणाचेही समर्थन करायला मागेपुढे पाहत नाहीत. मध्यंतरी अभिनेता संजय दत्त याला आतंकवाद्याना शस्त्रे पुरवल्याच्या गुन्ह्याखाली त्याला अटक झाली होती. त्यावेळी या धनदांडग्यांनी त्याच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न केले. गुन्हेगार हिरो ठरले तर मग खरे हिरो बाजूलाच पडतात. काही वर्षापूर्वी पुण्यामध्ये जोशी-अभ्यंकर हत्याकांड झाले होते. या प्रकरणातील आरोपी सामान्य कुटुंबातील होते.
31 ऑक्टोबर 1976 रोजी हे भीषण हत्याकांड झाले होते. या हत्याकांडातील आरोपी राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह यांची कोर्टात केस चालू असताना या आरोपींना पाहण्यासाठी कोर्टात लोकांची गर्दी होत असे. विशेषता शाळा, कॉलेजची मुले कोर्टाच्या आवारात मोठी घरी गर्दी करीत असत. या आरोपींनी पुण्यातील 11 लोकांचे निर्घुण खून केले असताना त्यांच्या कृत्याबद्दल घृणा निर्माण होण्याऐवजी त्यांना हिरो म्हणून पाहण्यासाठी जाणाऱ्या तरुणांची विकृत मनोवृत्ती दिसते. या विकृतीचा अभ्यास केल्यास त्याचा मोठा दोष आई-वडिलांच्याकडे जातो.
कारण या चंगळवादी प्रवृत्तीच्या मुलांना त्यांचे आई-वडील पैशाचा पुरवठा करतात. धनदांडग्यांची मुले दारू पितात. दारू पिऊन गाड्या चालवतात. फुटपाथवरील लोकांना चिरडून मारतात. अशाच प्रकारे अभिनेता सलमान खान याने दारू पिऊन रात्री फुटपाथवर झोपलेल्या लोकांना पाच जणांना चिरडले. त्यात चार जण जागीच मेले. पण आजही तो कोणतीही शिक्षा न होता उजळ माथ्याने वावरत आहे. उलट त्याला अटक झाल्यावर पोलिस अधिकारीच त्याच्याबरोबर सेल्फी काढत होते. त्याच्या जागी कोणी सामान्य व्यक्ती असता तर त्याला आतापर्यंत फाशी अथवा जन्मठेप झाली असती. पण या धनदांडग्यानी पैशाने जणू कायदा विकत घेतलेला असतो. सामान्य माणसाला न्याय मागण्यासाठी साधा वकील करायला परवडत नाही मात्र या धनदांडग्या सेलीब्रेटीसाठी वकिलांची फर्म काम करत असते. कायद्याचे हे अपंगत्व अशा घटनातून ठळक दिसून येत असते.
आपल्या महाराष्ट्र राज्यात दारू पिऊन बेधुंद अवस्थेत गाड्या चालवण्यांकडून जास्त अपघात होतात. हे अपघात विशेषता रात्री 11 ते १ या वेळात होतात. कारण यावेळी धनदांडगे पार्टी झोडून, दारूच्या नशेत मस्तवालपणे वेगाने गाड्या चालवून लोकांना चिरडून मारतात. पोलीस खाते याकडे फारसे लक्ष देत नाही. आजचे मानवी जीवन असुरक्षिततेचे व भीतीचे निर्माण झाले आहे. सकाळी घरातून कामावर गेलेला माणूस घरी सुरक्षित येईल याची कोणी खात्री देऊ शकत नाही. सामान्यांच्या जीवाला मोलच उरलेले नाही.
सारी परिस्थिती अस्वस्थ व बैचेन करणारी आहे. स्वजनांपासून जेव्हा भीती वाटू लागते तेव्हा माणसाचे जीवनच असुरक्षित बनते. या अस्वस्थतेवर ताबडतोब उपाय केला नाही तर सर्वांचे अस्तित्वच धोक्यात येईल. कायदे कडक करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. आपण लोकशाही स्वीकारली असली तरी ठोकशाहीने देश चालत असेल तर काळ आपल्याला क्षमा करणार नाही.