बेनिक्रे ग्रामपंचायतीमधील वाद कायम; खुलाशाऐवजी पुन्हा ग्रामसभेचे आश्वासन, ग्रामस्थांचा संताप

कागल: बेनिक्रे ग्रामपंचायतीमध्ये ‘माझी पंचायत’ पोर्टलवर चुकीचे फोटो अपलोड केल्याचा वाद अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व तरुणांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, विकास कामांमधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत जाब विचारला होता.

Advertisements

प्रशासक, सदस्य आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी चार दिवसांत खुलासा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती, परंतु प्रशासनाने केवळ पाच तरुणांनाच चर्चेसाठी बोलावल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. परिसरात जमावबंदी असल्याने मुरगूड पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Advertisements

तरुणांची आक्रमक भूमिका:

फक्त पाच जणांसमोर नव्हे, तर संपूर्ण गावासमोर खुलासा करण्याची मागणी तरुणांनी केली. प्रशासनाने पुढील महिन्यात ग्रामसभा घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचे आश्वासन दिले, मात्र आजच्या बैठकीत थेट उत्तरे देण्यास टाळाटाळ झाल्याचा आरोप करत तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रमुख मागण्या व आरोप:

चौकशीची मागणी: अपूर्ण विकास कामे पूर्ण झाल्याचे दाखवून बिले उचलली गेली आहेत का, याची सखोल चौकशी व्हावी.

Advertisements

निकृष्ट कामे: ग्रामस्थांनी कामे पाहिल्यानंतर ती अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाची असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

आंदोलन सुरूच: जोपर्यंत सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा तरुणांनी दिला आहे.

या प्रकारामुळे गावातील नागरिक विकास कामांबाबत अधिक जागृत होत असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, भविष्यातही ग्रामस्थ अशाच प्रकारे उघडपणे प्रश्न उपस्थित करतील अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे

Leave a Comment

error: Content is protected !!