सागर कोंडेकर यांचा सवाल : वीज तोडल्याने कागलमधील शेतकरी आक्रमक, तोडलेली कनेक्शन तात्काळ जोडण्याची मागणी
कागल (प्रतिनिधी) : वीज वितरण कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीने सुरू केलेली वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम बंद न केल्यास शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होईल असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर यांनी दिला आहे. तसेच तोडण्यात आलेली कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत अन्यथा वीज कर्मचाऱ्यांना गावबंधी करु असा इशाराही त्यांनी दिला. कागल चे उपविभागीय अभियंता विनोद घोलप यांना निवेदन देण्यात आले आहे.
कागल तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची थकबाकी वसूलीसाठी पुर्वकल्पना न देता कनेक्शन तोडण्यात आली आहेत. मात्र बिलांच्या दुरुस्तीबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेता वीज कनेक्शन का तोडण्यात येत आहेत? असा सवालही उपस्थित करण्यात आला
शेजारच्या कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांना मोफत वीज देवू केली आहे. मात्र महाराष्ट्रात सक्तीने वसूली करत कनेक्शन तोडली जाते. या विरोधाभासाची प्रचंड अस्वस्थता शेतकऱ्यांमध्ये आहे.
याबाबतही कोंडेकर यांनी सरकारचा तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी राजेंद्र बागल, नितेश कोगनोळे, प्रभु भोजे, भालचंद्र राऊत, महावीर डुगे, कृष्णात शेंडे, सुधीर पाटील (म्हाकवे), बाळासाहेब शेळके, सचिन सोनुले, युवराज गुरव यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.