मुरगुड ( शशी दरेकर ) – मुरगूड येथील पैलवान आनंदा महादेव मांगले (वय 46 वर्षे) यांचे जिन्यावरून पडल्याने अपघाती निधन झाले. घटनेची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवार दि. २४ रोजी सकाळी पै. आनंदा मांगले हे त्यांच्या राहत्या घरातील जिन्यावरुन अचानकपणे पाय घसरुन पडल्यामुळे बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामिण रुग्णालयामध्ये नेले. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासुन ते उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले. चुलत भाऊ संभाजी मांगले यांनी घटनेची वर्दी मुरगुड पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास सहायक फौजदार जरग करीत आहेत.
नगरसेविका रेखाताई मांगले यांचे ते पती होत. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू, यशस्वी उद्योजक, हॉटेल व्यवसायिक व मुरगुडातील दानशूर म्हणून ते परिचित होते. बैलगाडी शर्यतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागामध्ये त्यांच्या अजिंक्य बैल जोडीचा दबदबा होता. निराधार, महिला, विद्यार्थी, विविध मंडळे यांना मोठ्या रकमेच्या देणग्या देण्याची त्यांच्याकडे दानत होती.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच क्रीडाशौकीन, कुस्तीपटू, बैलगाडी शर्यत शौकीन, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध मंडळांचे व सामाजिक कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज मंगळवार हा आठवडी बाजाराचा दिवस असूनही शहरातील बहुतांश दुकानदारांनी आपला व्यवसाय बंद ठेवून दुखवटा व्यक्त केला. राहत्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी संताजी घोरपडे कारखान्याचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेखान जमादार, यशोवर्धन मंडलिक, जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, डॉ. रमेश भोई, आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कै. मांगले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवार दि. २५ रोजी सकाळी ९ वा. दत्त मंदिर नदीघाट स्मशानभूमी मुरगुड येथे आहे.
पैजा लावणारा पैलवान!
माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा निष्ठावंत कार्यकर्ता व प्रा. संजय मंडलिक यांच्या गटाचा शिलेदार म्हणून ते सर्वपरिचित होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मंडलिकांसाठी दहा लाखाची पैज लावली होती. पैज हरल्यावर पैजेची रक्कम जिंकणाऱ्याला सुपूर्द केली. प्रत्येक इलेक्शनला अशी पैज ते लावत त्यामुळे मंडलिकांसाठी लाखोंच्या पैजा लावणारा पैलवान अशी त्यांची जिल्हाभर ओळख होती.
You’re so awesome! I don’t believe I have read a single thing like that before. So great to find someone with some original thoughts on this topic. Really.. thank you for starting this up. This website is something that is needed on the internet, someone with a little originality!