अस्पृश्यांसाठी महात्मा जोतिबा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली. या घटनेला 172 वर्षे झाली. अस्पृश्यता हा भारतीय समाजाला लागलेला कलंक आहे. या समाजाचा उद्धार करावयाचा असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे अशी जोतिरावांची धारणा होती. शिक्षणामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल, त्यांना मनुष्यत्व प्राप्त होईल. स्त्रिया आणि शूद्र यांच्या तत्कालीन स्थितीला शिक्षण हेच कारणीभूत आहे. त्यामुळे स्त्रियांची स्थिती शिक्षणाच्या माध्यमातून सुधारण्यासाठी 3 जुलै 1848 रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. या शाळेला सनातनी लोकांच्याकडून प्रचंड विरोध झाला.
सर्व बाजूंनी महात्मा फुले आणि त्यांचे सहकारी यांच्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला. शाळा काढण्यासाठी त्यांना तात्यासाहेब भिडे, सदाशिव हाटे, सखाराम परांजपे, मोरो वाळवेकर, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, बापूसाहेब मांडे, केशवराव भवाळकर आदी मित्रमंडळीचे सहकार्य झाले. मुलींची शाळा काढल्याने साऱ्या पुण्यात हा चर्चेचा विषय झाला. पेशवाईचा प्रभाव असलेली ही सनातनी मंडळी चवताळून उठली. सहकार्य करणाऱ्या सर्व मित्रांचे नेतृत्व महात्मा जोतिबा फुले करीत असल्याने हे लोक जोतिबांना वैयक्तिक त्रास देऊ लागले. जोतिबांचे वडील गोविंदराव फुले यांना वाळीत टाकण्याची धमकी देण्यात आली. त्यांना मानसिक त्रास होऊ लागला.
नाईलाजाने गोविंदरावांना आपला मुलगा जोतिबा व सून सावित्रीबाई या दोघांना घराबाहेर काढण्यास भाग पडले. मुलींची शाळा काढल्याचा आनंद जोतिबा आणि सावित्रीबाई यांना झाला होता. वर्षानुवर्ष पुरुषप्रधान संस्कृतीला बळी पडत असलेली स्त्री शिक्षणामुळे गुलामगिरीतून मुक्त होणार होती. स्त्रीमुक्ती कार्याचे पुण्य जोतिबांना व सावित्रीबाईंना मिळणार होते. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व त्यांचे सहकारी यांनी स्थापन केलेल्या पहिल्या शाळेमध्ये सहा विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला. त्यांची नावे अशी, अन्नपूर्णा जोशी (वय 5, ब्राह्मण), सुमती मोकाशी (वय 4 ब्राह्मण), दुर्गा देशमुख (वय ६ ब्राह्मण), माधवी थत्ते (वय ६ ब्राह्मण) सोनू पवार (वय ४ मराठा), जनी कार्डिले (वय 5 धनगर). या मुलींना शाळा शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिका मिळत नव्हती. पुण्यातील वातावरण शाळेला पूरक नव्हते.
ज्ञानाची मक्तेदारी असणाऱ्या मंडळींना जोतिबांचे काम आवडत नव्हते. ते जोतिबांचा द्वेष करीत होते. पण ज्योतीबा निर्भय होते. जोतिबांनी सावित्रीबाईंना घरी शिक्षण दिले. शाळेत शिक्षिका मिळत नसल्याने त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाईंना संधी दिली. माळी या शूद्र जातीतील स्त्री शिकवते हे सनातन्यांना सहन झाले नाही. एवढेच नव्हे तर फुले यांच्या माळी जातीमधून विरोध होऊ लागला. मातंग समाजाचे लहुजी साळवे आणि राणोजी महार यांनी शाळा चालवण्यासाठी जोतिबांना मोठी मदत केली. महात्मा फुले यांनी 17 शाळा काढल्या. विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघो सुखराम, धुराजी चांभार, विनायक गणेश, धोंडो सदाशिव, गणू मांग, गणू राघोजी यांनी शिक्षक म्हणून शिकवण्याचे काम केले.
शिक्षण क्षेत्रातील कार्यामुळे जोतिबांचा सर्व क्षेत्रात लौकिक वाढला. संघर्ष करीत ते हे महान कार्य करीत होते. लहानपणीच त्यांच्या घरी सगुनाबाईंनी त्यांच्यावर मानवतावादाचा प्रभाव पाडला होता. गोरगरिबांची सेवा करण्यात परमेश्वर आहे असे त्यांच्या मनावर बिंबवले होते. लहानपणी जोतिबांवर ख्रिस्ती प्रणित मानवतावाद व धर्मोपदेशकांचा समर्पित जीवन जगण्याचा प्रभाव पडला होता. थॉमस पेन यांच्या जस्टिस ऑफ हुमानिटी, राइट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्या पडला होता. त्यांनी थॉमस पेन यांची मानवतेची प्रतिष्ठा, व्यक्ति स्वातंत्र्याचा आग्रह आणि गुलामगिरीचा निषेध ही तत्तप्रणाली स्वीकारली.
11 मे 1988 रोजी मुंबईतील भायखळा जवळील मांडवी कोळीवाडा येथे आगरी, भंडारी, कोळी कामगार बांधव हजारांच्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी समाज क्रांतीकारक जोतिराव फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देऊन त्यांचा सत्कार केला. सामान्य माणसाने आपल्या उद्धारकर्त्याला अशी पदवी देऊन सन्मानित करण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. जोतिबांच्या वयाला 61 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मुंबईकर मंडळींनी हा सत्कार आयोजित केला होता. नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावळाराम यंदे, रामय्या व्यंकय्या अय्यावरू, मोरो विठ्ठल वाळवेकर, भाऊ डुंबरे पाटील या लोकांनी या कार्यक्रमात पुढाकार घेतला होता. ज्योतिबांचे महान कार्य स्वातंत्र्य चळवळीचे नेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना फार आवडले होते. महात्मा गांधी म्हणाले, महात्मा फुले देशाचे पहिले महात्मा आहेत, ते खरे महात्मा आहेत. अस्पृश्याना, स्त्रियांना, बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या थोर महात्मा ज्योतिबा फुले यांना मानाचा मुजरा.