शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्टचा नववा वर्धापनदिन उत्साहात
मुरगूड (शशी दरेकर) : छत्रपती शिवराय जसे आदर्श राजा व आदर्श योद्धा होते तसेच ते वृत्तीने योगी होते. सर्व सुखाच्या गोष्टी त्याग करून फक्त रयतेसाठी व धर्मासाठी आपले जीवन त्यांनी वाहिले होते असे आदर्श व्यक्तिमत्व जगाच्या इतिहासात पाहायला मिळत नाही. असे विचार श्री सदगुरूदास महाराज नागपूर यांनी मुरगुड येथील शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नवव्यां वर्धापन दिनाच्या सोहळ्यात व्यक्त केले.
सदगुरूदास महाराज पुढे म्हणाले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती करीत असताना त्यांनी भारतीय अध्यात्म विचारांची धारणा केल्यामुळे ते आपल्या ध्येयावर अचलपणे, ठामपणे उभे राहिले.
स्वराज्य निर्मिती करिता संत साधू यांचे आशीर्वाद घेतले. शिवरायांना कीर्तनाची खूप आवड होती. त्यामुळे विविध कीर्तनकारांच्या कीर्तनांचा त्यांनी श्रवणानंद घेतला त्याचबरोबर विविध धार्मिक स्थळांच्या तेल दिव्याची व्यवस्था स्वतः लक्ष घालून केली. परकीय आक्रमक मुळे उध्वस्त होऊ पाहणारी भारतीय धार्मिक व सांस्कृतिक घडी शिवरायांनी पुन्हा बसवून दिली आणि संत व संस्कृती यांच्या संरक्षणाचा वसा त्यांनी घेतला होता त्यामुळेच त्यांचे संस्कृती रक्षण व धर्म रक्षण हे कार्य सुद्धा लक्षात घेण्याजोगे आहे.
छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही अद्भुत अशीच म्हणावी लागेल कारण रयतेच्या देहाची काळजी घेत असताना देवाच्या देवळातील दिव्यांची व्यवस्था सुद्धा झाली पाहिजे इतकी जागृकता हे त्यांच्या महानतेचे धोतक आहे.
छत्रपती शिवराय यांनी अभंग रचना सुद्धा केलेली आहे आणि त्या अभंगारचनांमधून भारतीय संस्कृती मानवता व मातृभूमी चे संरक्षण या बाबी प्रकर्षाने मांडल्या आहेत. जर आपण शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाला आपल्या आचरणामध्ये घेतले तर नवे राष्ट्र घडावयाला वेळ लागणार नाही असे विचार त्यांनी मांडले.
सदर वर्धापन दिन सोहळ्यामध्ये सौ. जयश्रीताई सांगवीकर यांना त्यांच्या आध्यात्मिक कार्याबद्दल ट्रस्टतर्फे कार्यगौरव सन्मानपत्र अर्पण करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक, जेष्ठ पत्रकार, लेखक श्री चंद्रकांत माळवदे यांच्या विवेक दीप या ग्रंथाचे प्रकाशनही या सोहळ्यात झाले तसेच सौ. विजयाताई अडसूळ यांचा कीर्तन प्रवचन सेवेबद्दल गौरव करण्यात आला. सालाबाद प्रमाणे इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजे समरजीतसिंहजी घाटगे हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे वहिनीसाहेब, सौ नवोदिता घाटगे वहिनीसाहेब, श्रद्धेय प्रकाश शास्त्री मुळे अमरावती, मंदाताई गंधे, डॉ. श्री.देशमुख तथा डॉक्टर काका हे होते.
प्रास्ताविक सौ स्नेहाताई महाजन यांनी केले. आभार श्री अशोकराव कौलकर सर यांनी मानले तर सौ संपदा वनारसे नाझरे तसेच शशांक देशपांडे यांनी गायन सेवा सादर केली त्यांना अभिजीत अगस्ती व सुषमा साठे यांनी साथ केली . कार्यक्रमाला वारकरी संप्रदायासह आध्यात्मिक अभ्यास करणारा मोठा प्रेक्षक वर्ग सहभागी होता. सूत्रसंचालन प्रा. विनय कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक बाळकृष्ण चौगुले सर ,श्री बाळासाहेब सूर्यवंशी – पाटील ,सुहास घाडगे ,सम्राट भोपळे ,श्रीरंग पाटील, पंकज इनामदार, पुरोहित साहेब, डॉक्टर निषीताई पोंक्षे, श्री हिंदुराव भोईटे सर, संजय अडसुळे सर राजू चव्हाण, राजाराम हतकर, तानाजीराव भराडे इत्यादी मान्यवरांचे सहकार्य लाभले .