कोल्हापूर, दि. 17 : येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजूर, महिला व बालके यांच्या आरोग्य तपासणीकरिता जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्य चिकित्सक सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर यांच्या वतीने पूर्वनियोजन करुन आरोग्य तपासणी करण्याची कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.
ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा याकरिता ऊसतोड कामगारांची नोंदणी करुन त्यांना ऊसतोड कामगार असल्याचे ओळखपत्र देण्याबाबत शासनाचे कामकाज सुरु असून या अंतर्गतच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक काल सामाजिक न्याय भवन, कोल्हापूर येथे पार पडली, यावेळी ते ऑनलाईन सहभागी होवून बोलत होते.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, सद्याच्या गळीत हंगामाकरीता “वन नेशन वन रेशन” अंतर्गत धान्य मिळण्यासाठी जवळच्या तहसिलदार कार्यालयाकडे अर्ज करावेत. तसेच पुढील वर्षीच्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड कामगारांना कामाच्या ठिकाणी धान्य मिळण्यासाठी आपल्या साखर कारखान्यांच्या मदतीने अर्ज करावेत. याकरिता जिल्हा पुरवठा विभाग आपणास मदत करेल.
बैठकीस समितीचे जिल्हास्तरीय सदस्य तसेच समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त तथा सदस्य सचिव विशाल लोंढे, ऊसतोड संघटनांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ऊसतोड कामगार संघटनेचे प्रतिनिधी प्राध्यापक डॉ. आबासाहेब चौगुले यांनी मानले.