मुरगूडमधील औषध विक्रेत्यांना सन्मानित केले जाणार
मुरगूड ( शशी दरेकर ) : समाजामध्ये बदलत चाललेल शिवजयंती स्वरुप विचारात घेता, शिवरायांच्या विचारांचे खंडन होवून चंगळवादी प्रवृत्तीला पेव फुटताना दिसत आहे. नुसता धांगड धिंगाणा करण्याच्या उद्देशाने साजरी केली जाणारी जयंती तरुणाईला शिवरायांचे कर्तुत्व विसरायला लावत आहे.त्यामुळे विचारांची शिवजयंती करून तरुणाईपुढे आदर्श ठेवण्यासाठी व शिवरायांच्या कर्तुत्ववाचा गौरव करण्यासाठी प्रति वर्षीप्रमाणे रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी हा आगळावेगळा शिवजयंती सोहळा आयोजित करीत आहोत. तरी या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा व शिवसोहळ्याचे साक्षीदार व्हा!असे आवाहन शिवप्रेमी ग्रुप व मुरगुडचे सर्वेसर्वा शिवभक्त धोंडीराम परीट यांनी माध्यमांशी बोलताना केले.
मुरगुड ता.कागल येथे शिवप्रेमी मुरगुड यांचे वतीने प्रत्येक वर्षी शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या सोहळ्यात प्रत्येक वर्षी प्रसिध्दी पासुन वंचित असणाऱ्या पण समाजासाठी अविरत काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते.हा आगळावेगळा सोहळा फेब्रुवारी 2009 पासुन 15 वर्षे अखंडीतपणे चालू आहे.प्रति वर्षाप्रमाणे या वर्षीही रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी शिवरायांचा जयंती सोहळा शिवमय वातावरणात साजरा केला जातो आहे.
या शिवजयंती सोहळ्यात व्याख्यान आणि विविध स्तरातील व्यक्तींचा सत्कार सोहळा आयोजित केला जातो.या सोहळ्यात 2009 पासुन सर्पमित्र,आरोग्य कर्मचारी, पत्रकार,स्वातंत्र्यसैनिक, डॉक्टर ,कर्तुत्ववान अपंग व्यक्ती, पैलवान, मोलकरीण महिला, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ती अशा विविध स्तरातील व्यक्तीना या विचारमंचावर सन्मानित केले आहे.त्यामुळे हा सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
या वर्षी या शिवसोहळ्यात कोरोना काळात अविरतपणे काम केलेल्या औषध विक्रेत्यांना सन्मानित केले जाणार आहे.या कार्यक्रमाच्या दरम्यान अखिल भारतीय वरीष्ठ ज्येष्ठ नागरीक महासंघ गडहिंग्लजचे व मेंबर आॅफ सेंन्ट्रल कौन्सिलचे रामकुमार सावंत हे उपस्थितांना “….असे होते शिवराय”या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.हा कार्यक्रम मुरगुड शहर पत्रकार फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुनिल डेळेकर,उमा युवराज मोरबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.सुरवातीला स्वागत व प्रास्ताविक होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुरगुड नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचारी श्रीमती मंगल कांबळे यांच्या शुभहस्ते तर भवानी तलवार पूजन सौ.सायरा सलीम बागवान यांचे शुभहस्ते होणार आहे. शिवप्रार्थनाचे गायन धोंडीराम परीट करतील.त्यानंतर औषध विक्रेत्यांचा सत्कार समारंभ, विशेष सत्कार,सत्काराला उत्तर, व्याख्यात्याचे मार्गदर्शन व शेवटी आभार होईल.हा कार्यक्रम मुरगुड बाजारपेठेत, संदीप ड्रायक्लीनर्स मुरगुड,ता.कागल च्यासमोर संपन्न होणार आहे.