मुरगूड (शशी दरेकर): ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या आवाहना नुसार मुरगूड शहरात जर किरीट सोमय्या आले तर त्यांना विरोध करण्यासाठी कोणीही उपस्थित राहणार नाही . मात्र ते ज्या मार्गावरून येणार आहेत त्या मार्गावर काळे झेंडे लावून त्यांचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
किरीट सोमय्या मंगळवार दि- २८ सप्टेंबरला मुरगूड पोलीस स्टेशन मध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार द्यायला येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या मनात तीव्र असंतोष आहे. यातूनच मुरगूडमध्ये त्यांना विरोध करण्यासाठी चक्क मुरगूड शहरात त्यांना प्रवेश बंदीचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता.तसेच येथील स्थानिक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी ही शहर बंदीचा निर्णय घेतला होता . त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आणि पुन्हा कोल्हापूरमध्ये सोमय्या याना विरोध होणार असे वातावरण तयार झाले होते.
पण मंत्री मुश्रीफ यांनी आवाहन केल्या नुसार आता त्यांना होणारा विरोध मावळल्याचे दिसले.मुश्रीफ यांनी आवाहन केल्यानंतर लगेच पालिका कार्यालयात पत्रकार परिषद घेत जमादार यांनी आपली भूमिका मांडली.ते म्हणाले वास्तविक पाहता किरीट सोमय्या यांनी पर्यटना सारखे फिरत न बसता व चितावणीखोर भाष्य न करता यायला पाहिजे.जर दौऱ्यामध्ये ठरल्या प्रमाणे ते मुरगूडला आलेच तर त्यांना कोणीही नागरिक विरोध करण्या साठी जाणार नाहीत.सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहतील. शिवाय अत्यंत शांततेत सोमय्या ज्या मार्गावरून पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहेत त्या मार्गावर मात्र त्यानी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून काळे झेंडे लावले जातील. यावेळी उनगराध्यक्षा रंजना मंडलिक, नगरसेवक विशाल सूर्यवंशी, नगरसेवक रवी परीट, पक्षप्रतोद संदीप कलकूटकी, सचिन मेंडके, माजी नगराध्यक्ष प्रकाश चौगले आदी प्रमुख उपस्थित होते.