कागल(विक्रांत कोरे) : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभय योजना २०२२ बाबत जागृती करणेकरिता करदाते, कर सल्लागार, थकीत व्यापारी व उद्योजक घटकांना माहिती व्हावी या अनुषंगाने मॅक व वस्तु व सेवा कर विभाग कोल्हापूर यांच्या वतीने मॅक येथील “कै.रामप्रताप झंवर सभागृह” येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते.
सदर चर्चासत्रत स्वागत व मनोगत मॅक चे अध्यक्ष संजय पेंडसे यांनी केले. नवनवीन करप्रणाली बाबत माहिती व मार्गदर्शन पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना व्हावे या हेतूने संस्थेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत असे नमूद केले. तसेच जुन्या BST व VAT ची थकबाकी, व्यवसाय कर, उद्योग व कर्मचार्यांचा व्यवसाय कर भरणे ज्यांचा थकीत राहिलेला अशा सर्व थकबाकीदारांनी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या अभय योजना २०२२ याचा लाभ घ्यावा असे आवाहन मॅकच्या वतीने करण्यात आले.
श्रीमती सुनिता थोरात, राज्यकर सह आयुक्त (प्रशा) सेवा व विक्रीकर विभाग, कोल्हापूर यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती तेजस्विनी मोरे,राज्यकर उपायुक्त, कोल्हापूर सदर चर्चासत्रामध्ये म्हणाल्या , जीएसटी पूर्व थकबाकीदार करदात्यासाठी राज्य सरकारने आणलेली अभय योजना २०२२ ही करदाते, सर्व व्यापारी व उद्योजक घटकांना अतिशय लाभदायक व चांगली योजना आहे. कमी करामध्ये थकबाकीमुक्त होण्यासाठी करदाते, सर्व व्यापारी व उद्योजक घटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोल्हापूर विभागाच्या वतीने करण्यात आले.
केवळ ३० ते ३२ टक्के कर भरून थकबाकीतून करदात्यांना मुक्ती
सदर योजना करदाते, सर्व व्यापारी व उद्योजक घटकांसाठी उपयुक्त असून केवळ ३० ते ३२ टक्के कर भरून थकबाकीतून करदात्यांना मुक्त होता येणार आहे. कर दात्यांची सुमारे ७२ टक्के रक्कम वाचणार असून या पूर्वीच्या शासनाने जाहीर केलेल्या योजनेपेक्षा ही योजना अतिशय लाभदायक व चांगली योजना असलेचे नमदू केले.त्यामुळे सर्वाधिक थकबाकीदार करदात्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे सांगितले.
करणसिह कदम, राज्यकर अधिकारी, कोल्हापूर विभाग, यांनी अभय योजना २०२२ चे पिपीटी द्वारे उपस्थित उद्योजक व करदात्यांना अतिशय सोप्या व सुंदर अशा पध्दतीने माहिती दिली. तसेच राजीव चौगुले, सहाय्यक राज्यकर आयुक्त यांनी अभय योजना २०२२ बाबत मान्यवरांना माहिती दिली.
सदर चर्चासत्र प्रसंगी सेवा व विक्रीकर विभागाच्या वतीने राजीव चौगुले, हर्षवर्धन सागरे, सहाय्यक राज्यकर आयुक्त,सुशीलकुमार बर्गे, करणसिह कदम, श्रीमती माधुरी म्हेत्रे,राज्यकर अधिकारी तसेच मॅक चे उपाध्यक्ष यशवंत पाटील, ऑन.सेक्रेटरी सचिन कुलकर्णी, संचालक संजय जोशी, निमंत्रित सदस्य कुमार पाटील, सुरेश क्षीरसागर, मॅक चे मान्यवर सभासद बंधु-भगिनी कर सल्लागार व करदाते मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ऑन.सेक्रेटरी सचिन कुलकर्णी व राजीव चौगुले, सहाय्यक राज्यकर आयुक्त यांनी मानले.