कागलच्या किड्स हब व कृष्ण तुका स्कूलमध्ये दिव्यांच्या प्रकाशात त्रिपुरारी पौर्णिमा साजरी

कागल (प्रतिनिधी) : येथील किड्स हब इंग्लिश मीडियम स्कूल आणि कृष्ण तुका इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भव्य दीपोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.

Advertisements

या उपक्रमानिमित्त संपूर्ण शाळा परिसर पणत्या आणि दिव्यांच्या तेजोमय प्रकाशाने उजळून निघाला होता. दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक व रंगीबेरंगी पोशाख परिधान करत पाण्यावर तरंगणारे दिवे लावून दीपोत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या प्रकाशोत्सवामुळे शाळेच्या परिसरात अत्यंत प्रसन्न आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

Advertisements

भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सवांचे महत्त्व विद्यार्थ्यांवर रुजावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीपोत्सवानंतर शाळेच्या मैदानावर सर्व विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांनी एकत्रित बसून सामूहिक स्नेहभोजनाचा आनंद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, सहकार्य आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ झाली.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाचगावे, व्यवस्थापक संदीप पाचगावे, मुख्याध्यापिका सौ. वृषाली पाचगावे यांच्यासह दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिव्यांच्या प्रकाशात आनंद, उत्साह आणि संस्कृतीचा संगम घडवणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला.

Leave a Comment

error: Content is protected !!