दोन मोटरसायकली, दोन सायकलीसह संसारोपयोगी साहित्य जळून खाक
कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथील झाकीर आब्बास शेख यांच्या राहत्या घराशेजारी असलेल्या शेडला मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत शेडमधील दोन मोटरसायकली, दोन सायकली, जनावरांसाठी ठेवलेला चारा आणि संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. कागल नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने तसेच ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाणी योजनेचे पाणी सुरू करून ही आग वेळेत आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेने शेख यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घरालगत असलेल्या शेडमध्ये बरेच प्रापंचिक साहित्य ठेवले होते. दोन मोटरसायकली व दोन सायकलीही पार्क केल्या होत्या. कडबा, पिंजर व कडबा कुट्टी ही वैरण येथे होती. लाकडी सामान होते.

तीन वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धूर वर आला व बघता बघता आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. या शेडला लागून असलेल्या जनावरांच्या गोठ्यातून जनावरांची दावी कापून जनावरे बाहेर काढली. मोठा अनर्थ टाळल्याने कोणती जीवित हानी झालेली नाही.
तलाठी विठ्ठल जंगले, पोलीस पाटील सुरज कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.