कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या अध्यक्ष निवडीची २९ ऑक्टोबरची तारीख जशी जवळ येत आहे, तसा सहकारातील थरार वाढला आहे. कोरमचा पेच आणि फोडाफोडीची भीती टाळण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी आपल्या संचालकांना सहलीवर पाठवण्याचा डाव टाकला आहे. समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. मात्र, अध्यक्ष निवडीच्या दिवशी कोणताही गेम होऊ नये, यासाठी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी मास्टरस्ट्रोक चाल खेळली आहे.
समविचारीचे १३ संचालक शुक्रवारी कर्नाटकातील आप्पाचीवाडी येथे हलसिद्धनाथाचे दर्शन घेऊन अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. त्यांना २९ ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूरपासून दूर ठेवण्यात येणार आहे. दुसरीकडे महायुतीचे १२ संचालकही गोवा वारीच्या तयारीत आहेत. आपल्या गटाला फुटीपासून वाचवण्यासाठी आणि ऐनवेळी रणनीती आखण्यासाठी महायुतीने गोवा पॅटर्न अवलंबला आहे.

अध्यक्ष निवडीसाठी कोरम हाच मोठा अडसर आहे. नियमानुसार सभेसाठी किमान १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. समविचारीकडे १३ असल्याने त्यांना एका मताची गरज आहे, तर महायुतीला दोन सदस्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंग किंवा तटस्थ राहण्याच्या शक्यतेने धाकधूक वाढली आहे. शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा असली, तरी २९ ऑक्टोबरची सभा अत्यंत नाट्यमय ठरणार आहे.