मुरगूड (शशी दरेकर) : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुरगूडचे ग्रामदैवत असलेल्या आई अंबाबाई मंदिर व मंदिर परिसरात शहरातील तरुणांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविली.
सोमवार आणि बुधवार अशा दोन टप्प्यांत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. दररोज सुमारे चार तास श्रमदान करून तरुणांनी संपूर्ण मंदिर व परिसर स्वच्छ केला.

तसेच मुरगूड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या बंबाद्वारे संपूर्ण मंदिर पाण्याने धुऊन काढण्यात आले.
सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून युवकांनी हातात झाडू, खराटे व स्वच्छतेचे साहित्य घेऊन स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. पहिल्या दिवशी मंदिरातील सभामंडप, होळ, गाभारा तसेच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर बुधवारी संपूर्ण मंदिर अग्निशामक बंबाच्या सहाय्याने पाण्याने धुऊन काढण्यात आले. सकाळी नऊ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम पूर्ण करण्यात आली. यावेळी मंदिराच्या शिखराचीही स्वच्छता करण्यात आली.
मुरगूडचे ग्रामदैवत असलेले आई अंबाबाई मंदिर हे नव्या दगडी बांधकाम शैलीमुळे मुरगूड शहरासह संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. नवरात्रोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यासह परजिल्ह्यातून व माहेरवाशिणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. तसेच आदमापूर येथील बाळूमामा मंदिराच्या अमावस्या यात्रेसाठी येणारे भाविकही मुरगूड येथील अंबाबाई मंदिराला भेट देऊन दर्शन घेतात. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर दिसावा, यासाठी तरुणांनी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या स्वच्छता मोहिमेत सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, संकेत शहा, प्रकाश परिषवाड, तानाजी भराडे, सागर शहा, प्रफुल्ल कांबळे, अक्षय पोतदार, संकेत भोसले, धनंजय सूर्यवंशी, शिवाजी चौगुले, अमर सुतार, आनंदा रामाणे, चेतन गवाणकर, शैलेश मंडलिक, उद्धव मिरजकर, रणजीत मोहिते, अजित राऊत, विशाल कापडे यांच्यासह अंबाबाई सेवेकरी व भक्त युवक, नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.