दोन कंपन्यांना तालुक्यातील सेतू केंद्रांचे वाटप
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तहसील आणि १ अप्पर तहसील अशा एकूण १३ कार्यालयांमधील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (सेतू सुविधा केंद्र) चालवण्यासाठी राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. या निविदा प्रक्रियेत अंतिम फेरीत गुणांक समसमान आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने गुणवत्तेच्या आधारे दोन कंपन्यांमध्ये तालुक्यांची विभागणी करून हे काम सोपवले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या प्रक्रियेनुसार, दिलीप इलेक्ट्रिकल अँड कॉन्ट्रॅक्टर (नाशिक) आणि ऑल्ट्रुइस्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (शिमला, हिमाचल प्रदेश) या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कराराअंतर्गत प्रतिनिधी म्हणून दिलीप इलेक्ट्रिकल अँड कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने सतीश पांडुरंग सासणे (प्रकल्प व्यवस्थापक) आणि ऑल्ट्रुइस्ट टेक्नॉलॉजीज प्रा. लि. च्या वतीने नितीन जनार्दन मायणे (प्रकल्प व्यवस्थापक) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत अधिकृत करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समितीचे सदस्य सचिव गजानन बाळसाहेब गुरव यांच्यासोबत हा करार करण्यात आला आहे.
तालुकानिहाय सेतू केंद्रांचे वाटप:
दिलीप इलेक्ट्रिकल अँड कॉन्ट्रॅक्टर, नाशिक (६ तालुके):
१. आजरा
२. भुदरगड
३. राधानगरी
४. शाहूवाडी
५. करवीर
६. शिरोळ
ऑल्ट्रुइस्ट टेक्नॉलॉजीज प्रा. लि., शिमला (७ तालुके):
१. हातकणंगले
२. इचलकरंजी
३. कागल
४. पन्हाळा
५. चंदगड
६. गगनबावडा
७. गडहिंग्लज
प्रमुख अटी व नियम:
१. कालावधी: दोन्ही कंपन्यांना हे कंत्राट पुढील ३ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहे. कामाचा दर्जा पाहून जिल्हा सेतू समितीद्वारे ही मुदतवाढ पुढे दिली जाऊ शकते.
२. हस्तांतरणास बंदी: हे सेतू केंद्र दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित किंवा पोट-भाड्याने (Sublet) देता येणार नाही.
३. सुविधा व दर फलक: केंद्रांवर नागरिकांच्या सोयीसाठी फर्निचर, उच्च दर्जाचे संगणक हार्डवेअर, ब्रॉडबँड इंटरनेट आणि शासनाने विहित केलेले दरपत्रक फलक लावणे बंधनकारक आहे.