मुरगूड विद्यालयाची आषाढी वारी, प्रबोधनाच्या माध्यमातून ठरली भारी

हजारो विद्यार्थी पावसाच्या सरीच्या साक्षीने भक्तिरसात न्हाऊन निघाले; समाज प्रबोधनचे फलक लक्षवेधी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित मुरगूड विद्यालय (हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज), मुरगूड यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषेत सहभागी होत संपूर्ण मुरगूड शहर भक्तिमय वातावरणाने भारून टाकले. यावेळी समजप्रबोधनाचे फलक लक्षवेधी ठरले.

Advertisements

      दिंडीत अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसह विविध संतांच्या वेषभूषा साकारून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि अभंगांच्या सुरेल स्वरांत “विठ्ठल… विठ्ठल…” नामघोष करत दिंडी मार्गक्रमण करत होती. या भक्तिमय वातावरणात सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तन्मयतेने सहभागी झाले होते.

Advertisements

    दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड, सामाजिक ऐक्य आणि शिक्षणाचे महत्त्व यांसारख्या विविध सामाजिक संदेशांचे प्रबोधनपर फलक हातात घेतले होते. त्यामुळे ही दिंडी केवळ धार्मिक परंपरेपुरती मर्यादित न राहता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरली.

     एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करून दिंडीची शोभा अधिक खुलवली. विशेष म्हणजे, संपूर्ण दिंडीदरम्यान पावसानेही अनुकूल साथ दिल्याने वातावरण अधिक प्रसन्न झाले.

Advertisements

भक्ती, संस्कार, शिस्त आणि समाजजागृतीचा सुंदर संगम घडविणारा हा दिंडी सोहळा मुरगूडकरांच्या कायम स्मरणात राहील.शहरात अनेक ठिकाणी महिलानी दिंडीचे औक्षण केले.तर सानिका स्पोर्ट्स चे दगडू शेणवी नगरसेवक राजू आमते ,विजय राजीगरे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

      संस्था सेक्रेटरी जयकुमार देसाई,अध्यक्षा शिवानीताई देसाई,चेअरमन मंजिरी मोरे देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,संस्था सदस्य युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासनाधिकारी पृथ्वी मोरे, संस्था सदस्य बाळ डेळेकर,शालेय समिती चेअरमन प्रविणसिंह पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.तर प्राचार्य एस.पी. पाटील,उपप्राचार्य व्ही. जे. घोरपडे, उपमुख्याध्यापिका यू.सी.पाखरे, पर्यवेक्षक ए.एन.पाटील, तंत्र विभाग प्रमुख पी बी लोकरे यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षिका कर्मचारी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!