कणेरी येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला भीषण आग; लाखोंचे नुकसान

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील कणेरी येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवार रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही आग अचानक लागली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, दवाखान्यातील औषधे, अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आणि इतर सर्व साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले आहे.

Advertisements

अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न

दवाखान्यातून आगीच्या ज्वाळा आणि धूर निघत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कागल नगरपरिषद, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत (Five Star MIDC) आणि शाहू साखर कारखान्याचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिक आणि तरुणांच्या मदतीने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या बचावकार्यात स्थानिक तरुणांनी मोठे सहकार्य केले.

Advertisements

लाखोंचे नुकसान, कारण अस्पष्ट

या भीषण आगीत दवाखान्यातील मौल्यवान वैद्यकीय सामग्री जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली—शॉर्ट सर्किट की अन्य काही कारण—याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासनाकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!