राज्याच्या आरोग्य विभागातील  १५ हजार कंत्राटी कर्मचारी होणार शासकीय सेवेत समाविष्ट : माजी खासदार प्रा. संजय मंडलिक

राज्य संघटनेकडून माजी खासदार मंडलिक यांचा सत्कार

वेतनासाठी ११५३  कोटी रुपये खर्चास शासनाची मान्यता

कोल्हापूर जिल्ह्यातील ६५०  कर्मचा-यांना लाभ

Advertisements

मुरगूड (शशी दरेकर) : आरोग्य विभागाकडे कंत्राटी कर्मचारी म्हणून सेवेत असणाऱ्या १५ हजार १० कर्मचाऱ्यांना शासकिय सेवेत समविष्ठ करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी  सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाल्याची माहिती माजी खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी दिली.

राज्याच्या आरोग्य विभागाने या कर्मचाऱ्यांच्या वेतना करीता सुमारे ११५३  कोटी रुपये खर्चास मान्यता दिली असून त्याचा लाभ कोल्हापूर जिल्हयातील ६५० कंत्राटी कर्मचा-यांना  होणार आहे. 

Advertisements

राज्य आरोग्य कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाची सोडवणूक केल्याबद्दल माजी खासदार मंडलिक यांचा सत्कार केला. त्या प्रसंगी प्रा.मंडलिक यांनी याबाबतची माहिती  देत उपमुख्यमंत्री शिंदे व  पालकमंत्री  आबिटकर यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

शिष्टमंडळा समोर बोलताना प्रा. मंडलिक म्हणाले,” गेल्या १५ ते  १८ वर्षापासून राज्याच्या आरोग्य विभागात आरोग्य सेविका, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, तालुका समुह संघटक, औषध निर्माण अधिकारी तसेच लेखा व तांत्रिक विभागाकडील कर्मचारी  अतिशय तंटपुज्या  वेतनावर काम करीत होतो. कौटुंबिक समस्येसह त्यांना  आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याकामी  मी सातत्याने  त्यांना शासकीय सेवेत समाविष्ठ करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रकाश आबिटकर आरोग्य यांच्याशी  सातत्याने पाठपुरावा केला.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या  सेवेचा विचार करुन शासनाच्या आरोग्य विभागाने दिनांक ०३ जून २०२६ च्या निर्णयाद्वारे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचा-यापैकी १० वर्षे व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचा-यांकरिता अभिसंख्या पदे निर्माण करुन त्यासाठी ११५३ कोटी रुपयाची तरतूद केली. त्यामुळे ५ ते ७ हजाराच्या वेतनावर काम करणा-या कर्मचा-यांना स्वतंत्र पद निर्मितीनंतर सुमारे २० ते २५ हजार वेतन मिळणार आहे. तसेच सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी विचारात घेवून सदर पदांची वेतन निश्चिती केली जाणार आहे. आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचे समाधान प्रा. मंडलिक यांनी व्यक्त केले.

  या प्रश्नांच्या  यशस्वी पाठपुराव्या बद्दल राज्य संघटनेच्या वतीने स्वप्निल गोसावी, जिल्हाध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष इंद्रजीत पाटील, महिला अध्यक्षा मृणाल कुलकर्णी व इतर कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाने माजी खासदार प्रा. मंडलिक यांचा सत्कार केला.

जिल्ह्यातील ६५० कर्मचाऱ्यांचा समावेश

राज्यातील १५,०१० कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणेचा ऐतिहासिक निर्णय झाला असून त्यात कोल्हापूर जिल्हा परिषद व महानगरपालिकेतील  ६५० कंत्राटी कर्मचारी नियमीत शासन सेवेत सामावून घेतले जाणार आहेत. यामध्ये आरोग्य सेविक( २८६ ) , स्टाफ नर्स (१७०), डाटा एंट्री ऑपरेटर (२४), लेखापाल (२२), तालुका समूह संघटक (१२), औषध निर्माण अधिकारी (५१), एस.टी.एस. व एस.टी.एल.एस. (२८), टेक्नीशीयन (२६) , विविध कार्यक्रम समन्वयक व अन्य (३१) अशा ६५०  कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!