राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त ५१ सफाई महिला कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

कागल : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबई, रहोबोथ सेवा संस्था, कागल आणि कागल नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कागल नगरपरिषदेतील ५१ सफाई महिला कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.

Advertisements

संत रोहिदास विद्यामंदिर, कागल येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी सौ. दिपाली जगताप यांनी स्वतः रचलेल्या “जय जय शाहू राजा!” या प्रेरणादायी कवितेद्वारे शाहू महाराजांना भावपूर्ण अभिवादन केले.

Advertisements

त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सफाई महिला कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण करण्यात आले. समाजाच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र सेवा बजावणाऱ्या या महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. प्रकाशराव गाडेकर (सभापती, पाणीपुरवठा विभाग) यांनी उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक करत उपस्थित ५१ महिला कर्मचाऱ्यांना साडी भेट देऊन त्यांच्या आनंदात भर घातली. आपल्या मनोगतात त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समतेच्या, लोककल्याणाच्या आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी अशा समाजोपयोगी उपक्रमांची आजही तितकीच आवश्यकता असल्याचे सांगितले. सफाई कर्मचारी हे समाजाचे खरे आधारस्तंभ असून त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Advertisements

कार्यक्रमास मा. सौ. सुवर्णा कुमार पिंष्टे (नगरसेविका), मा. सौ. संगीता संतोष रजपूत (नगरसेविका), मा. श्री. नितीन कांबळे (स्वच्छता निरीक्षक), सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सोनुले, मुख्याध्यापक शहाजी गायकवाड, गोपाळ गुंठे, संतोष सुतार, विलास दावणे, अमोल सोनुले, निलेश सोनुले, शिला कांबळे, ज्योती तराळ, अश्विनी शितोळे, करिष्मा सोनुले, प्रिया कांबळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीनराज जगताप यांनी केले, तर गोपाळ गुंठे यांनी उपस्थित मान्यवर, महिला कर्मचारी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

सदर समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्ट, मुंबई आणि रहोबोथ सेवा संस्था, कागल यांनी कागल नगरपरिषदेच्या सहकार्याने यशस्वीरीत्या केले.

Leave a Comment

error: Content is protected !!