नागरिकांनी शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी समता दिंडीत सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी
कोल्हापूर : कोल्हापुर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने 26 जून हा दिवस “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यात येणार आहे. लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन “सामाजिक न्याय दिन” म्हणून साजरा करण्यासाठी सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासन यांचे वतीने शुक्रवार 26 जून रोजी वेळ सकाळी 8.30 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा प्रचार प्रसार करून त्यांना अभिवादन करण्यासाठी समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
समता दिंडीची सुरुवात पालकमंत्री, प्रकाश आबिटकर, सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, , वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू छत्रपती महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर, तसेच जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भारूड व सहायक आयुक्त . सचिन साळे तसेच विविध प्रशासकीय विभाग प्रमुख यांचे उपस्थितीमध्ये होणार आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय विभागांनी, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वंचित घटकातील नागरिक उदा. तृतीयपंथी नागरिक, जेष्ठ नागरिक, महिला तसेच विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, एन.एस.एस, एन. सी. सी. विद्यार्थी विद्यार्थिनी, विविध तालमी, तरुण मंडळे, बचत गट व जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी स्वेच्छेने पारंपारिक वेशभूषेत, ढोल-ताशा, लेझीमपथक, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जीवनपटावर आधारित चित्ररथ इत्यादी सह समता दिंडीची शोभा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्याधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.
26 जून रोजी सकाळी 8 वाजता राजर्षि छत्रपती शाहू महाराज जन्म स्थळास भेट देवून मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करणेत येणार आहे. तदनंतर समता दिंडीस सुरुवात होईल. त्याचा मार्ग ऐतिहासिक दसरा चौक येथे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळयास हार अर्पण करुन- छत्रपती राजाराम महाराज पुतळा (व्हिनस कॉर्नर)- माईसाहेब महाराजांचा पुतळा- ऐतिहासिक बिंदू चौक- छत्रपती शिवाजी महाराज चौक- छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय गंगाराम कांबळे स्मारक ते ऐतिहासिक दसरा चौक मैदानात समता दिंडीची सांगता होईल.