शेतकरी योजनांच्या प्रलंबित अनुदानावर शिवसेनेचा इशारा

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचे अनुदान व लाभ वेळेत मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यात आले. एक महिन्याच्या आत प्रलंबित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास कृषी कार्यालयावर मोर्चा काढून कामकाजाची चौकशी करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Advertisements

       निवेदनात म्हटले आहे की, दुधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा नद्या तसेच विविध तलावांमुळे कागल तालुक्यात बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार आहे. रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, ठिबक सिंचन आदी योजनांची कामे पूर्ण होऊनही अनेक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही.

Advertisements

       केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत देण्याची तरतूद असताना अनेक शेतकऱ्यांना केवळ एक-दोन हप्ते मिळाले असून काहींना अद्याप एकही हप्ता मिळालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत आवश्यक कागदपत्रे सादर करूनही पाठपुरावा होत नसल्याचा आरोप करण्यात आला.

       कृषी सिंचन, कृषी अवजारे आणि इतर योजनांचे अनुदान प्रलंबित राहण्यास संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याचे सांगत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा तत्काळ निपटारा करून अनुदानाची रक्कम वितरित करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

       हे निवेदन तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अशोक पाटील, शहराध्यक्ष अजित मोडेकर, दिलीप पाटील, दिनकर लगारे, वैभव आडके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!