वडगाव नगरपरिषदेच्या विरोधात पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे बेमुदत साखळी आंदोलन

पेठ वडगाव : वडगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या आरक्षित जागेवरील खाजगी व्यक्तीचे अतिक्रमण त्वरित हटवावे आणि वडगाव शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लिकन पार्टी (हातकणंगले तालुका) च्या वतीने सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजीपासून बेमुदत साखळी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाची माहिती पक्षाचे हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री. सुरेश कांबळे यांनी दिली.

Advertisements

…तर गोठा व खोल्या बांधून दिल्या भाड्याने!

मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ‘७० ब’ ही जागा आरक्षित आहे. असे असतानाही श्री. जालिंदर कदम नावाच्या व्यक्तीने ती स्वतःची जागा नसतानाही त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले आहे. एवढेच नव्हे तर त्या जागेवर गोठा आणि खोल्या बांधून त्या भाड्याने दिल्या आहेत. हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असून नगरपरिषदेने ते त्वरित पाडून टाकावे आणि या जागेवर वडगाव शहरातील नागरिक व महिलांसाठी सार्वजनिक व्यायामशाळा बांधण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

Advertisements

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याबाबत नगरपरिषदेची उदासिनता

पेठ वडगाव शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी जनतेची अनेक वर्षांपासूनची तीव्र मागणी आहे. नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर या मागणीचा प्राधान्याने विचार होईल अशी अपेक्षा होती; मात्र अद्याप यावर नगरपालिकेने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे नगरपालिकेने पुतळा उभारण्याबाबत त्वरित स्पष्ट हमी द्यावी, अशीही मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या या बेमुदत साखळी आंदोलनात प्रीतम मोरे, सुरेश कांबळे, तानाजी तासगावकर, गौतम कांबळे, कुंदन पवार, बबलू कराडे, राज आयरेकर, दिपक कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले होते. तसेच या आंदोलनाला सौरभ कुदळे, संतोष माळी, अमर, अविनाश अंबेकर, जय कराडे, धनंजय गोंदकर, अमर पाटील, सुहास लाटवडेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, अशोक हातकणंगलेकर, सतीश आहिरेकर, अमोल गोजारे, आणि दशरथ कांबळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!