डायलिसिस सेंटरमुळे मुरगुड परिसरातील किडनी विकार रुग्णांना दिलासा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

५० खाटांच्या इस्पितळ उभारणीस लवकरच सुरुवात
मुरगूड ग्रामीण रुग्णालयात महाडायलिसिसचे उद्घाटन संपन्न : मंत्री हसन मुश्रीफ व संजय मंडलिक एकाच व्यासपीठावर              

मुरगूड ( शशी दरेकर ) : परिसरातील ४० ते ४५ खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मुरगुड मध्ये ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस विभाग सुरू झाल्यामुळे किडनीचे विकार असणाऱ्या रुग्णांना मोफत उपचाराने दिलासा मिळाला असून येथील उपचाराने रुग्ण रोगमुक्त होतील अशी आशा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
              येथील ग्रामीण रुग्णालयातील महाडायलिसिस विभागाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते संपन्न झाले. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर मुरगूडमध्ये मंत्री मुश्रीफ आणि संजय मंडलिक एकाच व्यासपीठावर आल्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Advertisements

     मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘रक्त शुद्ध करणाऱ्या डायलिसिसच्या सोयीमुळे रुग्णांना जीवदान मिळणार असून गरीब आणि सामान्य रुग्णांना कोल्हापूर वा गडहिंग्लजला जाणे शक्य नाही म्हणूनच मुरगुडमध्ये ही सोय करण्यात आली आहे. मुरगुडचे ५० बेडचे हॉस्पिटल मंजूर असून बांधकामासाठी जागा कमी पडणार आहे. जुन्या बिल्डिंगमध्ये आहे तो दवाखाना सुरू ठेवून मोकळ्या जागेमध्ये २५ बेडचे काम तातडीने सुरू करण्यात येणार आहे. मुरगुडचे इस्पितळ शंभर बेडचे करायचे असेल तर आणखीन जादा जागा लागणार आहे. पण संपर्कातील गावांची संख्या विचारात घेता १०० बेडच्या रुग्णालयाची येथे आवश्यकता आहे.

Advertisements

कोल्हापुरात सीपीआर हॉस्पिटल अत्याधुनिक बनले असून ११०० बेडच्या नवीन इस्पितळात ६०० सामान्य, २५० कॅन्सर आणि २५० सुपर स्पेशालिटीची सोय असेल.

        माजी खासदार संजय मंडलिक यांनी मुरगुड ग्रामीण रुग्णालयाचा  जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते आजच्या ५० बेडच्या ग्रामीण रुग्णालयापर्यंत झालेल्या वाटचालीची त्यांनी माहिती दिली. विशेष बाब म्हणून हे ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले होते. कोरोना काळात या रुग्णालयास सदाशिवराव मंडलिक फाउंडेशनने आयसीयू युनिट दिल्याचे सांगितले. मुरगुड रुग्णालयात पक्षाघात तसेच रस्ते अपघात यासाठीचा स्वतंत्र विभाग सुरू करावा, सोनोग्राफी मशीन आहे पण डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी ही त्यांनी यावेळी बोलताना केली.

      वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप कंदाडे यांनी स्वागत केले. आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी आभार मानले.

         या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत,  नगराध्यक्षा सुहासिनीदेवी पाटील, उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले यांच्यासह सर्व नगरसेवक,   मुख्याधिकारी अतिश वाळुंज,  रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रणजीत सूर्यवंशी व बी. एम. पाटील, एचएलएल प्रतिनिधी जगदीश हणमाने, पंचायत समिती सदस्य युवराज जाधव, माजी उपनगराध्यक्ष अनंत फर्नांडिस, बिद्रीचे माजी उपाध्यक्ष सुनील सूर्यवंशी,  विकास पाटील , देवानंद पाटील, पंचायत समिती सदस्या रूपाली आंगज, माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, सत्यजित चौगले, राजेंद्र आमते, बिद्री साखर कारखान्याचे संचालक रंगराव पाटील आदी उपस्थित होते.

 

सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया
       मार्च २०२७ नंतर कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही रुग्णाला गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबई – पुण्याला धाव घेण्याची गरज असणार नाही. ही सर्व सोय सीपीआर आणि शेंडा पार्क येथील रुग्णालयामध्ये असेल असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!