कागल/प्रतिनिधी – येथील राष्ट्रीय महामार्गावर होंडा शोरूम समोर टाटा ट्रकने पाठीमागून जोरात ठोकरल्याने एक इसम ठार झाला. नौशाद रफीक बागलकोटे रा.स्वातंत्र्य सैनिक वसाहत ,राजेंद्र नगर, कोल्हापूर असे त्याचे नाव आहे.हा अपघात सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला. घटनेची नोंद पोलिसात झाली आहे. याबाबतची फिर्याद टिपू रफीक बागलकोटे रा. स्वातंत्र्य सैनिक वसाहत, राजेंद्र नगर, कोल्हापूर यांनी पोलिसात दिली.
नौशाद बागलकोटे हा कोल्हापूर वरुन कोंगनोळी कडे निघाला होता. येथील राष्ट्रीय महामार्गावर होंडा शोरूम समोर तो बोलत उभा होता. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात जाणाऱ्या टाटा ट्रक क्रमांक एम.एच-२६ एच ७९०६ याने नौशाद यास जोरात ठोकरले. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.
त्याच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. टाटा ट्रक चालक अनिल हरिश्चंद्र गालफाडे रा.काळेवाडी वसाहत. पुणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.