![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240602-WA0017.jpg)
37 वर्षानंतर विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरुजणांचा तास
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड विद्यालय (हायस्कूल) ज्युनिअर कॉलेज मुरगूड या शाळेतील 1987 च्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला.तब्बल 37 वर्षानंतर भरलेल्या या स्नेह मेळाव्यात वय 55 गाठलेले 130 तरुण विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.सकाळी आठ पासूनच विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थी जमू लागले.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह ओसंडून वहात होता.37 वर्षापासून विखुरलेले मित्र मोठ्या संख्येने आज पहिल्यांदाच भेटत होते.
तीन ते सहा वर्षाच्या शालेय जीवनात हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवलेला चेहरा शोधत होते.चेहऱ्यात थोडाफार फरक जरी झाला असला तरी आपल्या जिवलग दोस्तांना ओळखण्यात फार कष्ट घ्यावे लागले असे नाही.प्रत्येक जण आपापले दोस्त शोधून काढण्यात यशस्वी ठरत होते.थोड्याच अवधीत मित्रांचे गट च्या गट तयार होऊ लागले. विद्यार्थ्यांबरोबरच तेव्हा शिकवत असलेले गुरुजन येऊ लागले इतक्या वर्षानंतर आपल्या गुरूजनाना पहाताना प्रत्येकाचे मन भरून येत होते.प्रत्येकजण आपल्या गुरुजनांचे आशीर्वाद घेण्याकरिता वाकून साष्टांग दंडवत घालत होते.गुरू शिष्यांचा हा मिलाप स्वर्गाला लाजवेल असाच होता.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/06/img-20240602-wa00184722382372839006555.jpg)
आपल्या सर्वच गुरुजनांनी आपल्या शिकवणुकितून आम्हा सर्व विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिले.त्यांच्यामुळेच आम्ही घडलो त्याची थोडीशी उतराई व्हावी म्हणून सर्वच वयोवृध्द गुरुजनांचा फेटे बांधून शाळेच्या गेट वरून फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. गुरुजनांच्या व विद्यार्थ्यांच्या मनोगतातून अनेकांची मने हेलावली.आपल्या विद्यार्थ्यांचा उत्कर्ष व जगण्याची जिद्द बघून गुरुजनांच्या चेहऱ्यांवर वेगळाच आनंद उमटत होता.
प्रत्येक गुरुजनांचे मनोगत ऐकताना 37 वर्षापूर्वीचे आमचे शिक्षक आणि आज तेच बोलणारे शिक्षक यांच्या मनाच्या तारुण्यात फार मोठा फरक दिसत नव्हता.अजूनही मनाने तरुणच दिसत होते.आमच्या आयुष्याची जडण घडण करणाऱ्या या गुरुजणांच्या विविध भावमुद्रा आम्हाला जगण्याची जणू नवी उमेद आणि प्रेरणाच देत होत्या.
दहावीच्या सर्वच तुकड्यांचे वर्ग भरवणेत आले.प्रत्येक तुकडीवर. पंचावन्नी गाठलेल्या आम्हा सर्वांना आमच्याच त्या जुन्या गुरुजणांनी 35 मिनिटाचा तास घेतला. इंग्रजी गणित हिंदी इतिहास असे तास झाले छन्नी दांडू,संगीत खुर्ची इत्यादी खेळासह बहारदार गाणी गायनाने सकाळी आठ ते सायंकाळी पाच पर्यंत शाळा सुरू होती.
साधारणपणे 130 विद्यार्थी विद्यार्थिनींसह मुरगूड विद्यालयाचे माजी प्राचार्य व शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष एस.जी.सावंत , चंद्रकांत माळवदे , जि.एन.नकाते ,एस. ए.पाटील, एस.जी. इंदलकर ,आर.डी कोरे, पी.एन डाफळे ,पी.एन.पाटील ,पी.पी.पाटील,आर.डी लोहार आदींसह महात्मा गुरुकुलचे दत्तात्रय म्हसवेकर शिवाय त्यावेळी शाळा स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवणारे कर्मचारी वर्ग उपस्थित होता.त्या सर्वांचाच बॅच च्या वतीने मानपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.यावेळी.बॅचचेच वर्गमित्र असलेले प्रा.एस.पी.पाटील यांची प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बॅच च्या वतीने शिवाजीराव सावंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक संच भेट दिला.
या सर्व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेचे मुख्याध्यापक प्रा. एस.पी.पाटील होते.प्रास्ताविक माजी विद्यार्थी संतोष वंडकर यांनी केले आभार विनय जोशी यांनी मानले तर सूत्रसंचालन चिंतामणी पारीश्वाड यांनी केले.