मुरगूड ( शशी दरेकर ) : ६ नोव्हेंबर वेळ रात्री १२ ची, ड्रीम इलेव्हन चा ऑIनलाईन निकाल पाहिला. अन चक्क एक कोटीचे बक्षीस जिंकल्याचे सचिन देवबा कांबळे (गायकवाड) (वय -३१,माधवनगर, मुरगूड ) याना समजले. अन अर्धा तास त्याच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा वाहात होत्या. काय करू अन काय नको अशी परिस्थीती, पत्नी प्रियांकाला उठवल आणि ड्रीम इलेव्हन मध्ये एक कोटी जिंकल्याचे सांगितले. तिलाही आश्चर्याचा धक्का बसला. ऑनलाईन ड्रीम इलेव्हन क्रिकेट स्पर्धा खेळत अवघ्या एका वर्षात भाऊबीजेच्या दिवशीच एक कोटीचा मानकरी ठरत सचिनचं ड्रीम पूर्ण झालं आहे. कुशाग्र बुद्धीच्या सचिनवर परिसरातुन कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.गेली दीड वर्ष सचिन १८६४ स्पर्धा खेळला आहे. त्यातील क्रिकेटच्या ४१५ स्पर्धा खेळला आहे. यामध्ये त्याने आतापर्यंत सुमारे ३५ हजार इतकी रक्कम घालवली आहे. मात्र भाऊबीजेच्या दिवशी पत्नी प्रियांका ( वय २७ ) हिने खेळण्यासाठी आग्रह केला. भाऊबीजेला तरी भरघोस बक्षीस लागतय का बघा असे पती सचिनला सांगितले. अन काय आश्चर्य ६ नोव्हेंबर रोजी द. आफ्रिका विरूद्ध इंग्लंड दरम्यानची २०-२० क्रिकेट स्पर्धत नं. १ क्रमांकाचे पॉईट ८७३ : ५ इतके गुण संपादित करून प्रथम क्रमांकांच्या एक कोटी बक्षीसाचा मानकरी ठरला.
ड्रीम इलेव्हन ची स्पर्धा खेळताना त्याने दोन्ही संघातील निवडलेल्या ११ खेळाडूनी त्याचे गुणांकन त्याला एक कोटीच्या बक्षीसा पर्यंत घेवून गेले. त्यासाठी त्याने प्रत्येकी ४९ रु. लावलेल्या १४ टीम पैकी ७ नंबरची टीम जिंकली आहे. त्यामध्ये ड्रीम इलेव्हनचा कर्णधार असलेल्या द. आफ्रिकेच्या रॅसी वान डर दुसे याने ९५ धावा केल्याने २५४ गुण प्राप्त केले. तर उपकर्णधार केलेल्या द.आफ्रिकेच्या रबाडाने हॅट्रीक घेतल्याने त्याने १३० : ५ गुण प्राप्त केल्याने कोटीचे बक्षीस जिंकण्यास मदत झाली. तसेच प्रत्येकी २९ रू. च्या १४ टीम केल्या. त्यातून ७ : ५० लारव रू. मिळाले आहेत. शिक्षणानं पदवीधर असलेला सचिन गायकवाड मूळचा कोळवण (भुदरगड) येथील असून साडेचार वर्षापूर्वी माधवनगर मुरगूड येथे येवून भाडयाच्या घरात राहात आहे. सुरूवातीला सेंट्रीग, मजुर म्हणूनही काम केले. गेली सात महिने येथील श्री समर्थ मल्टिस्टेट अर्बन बँकेत बिझनेस डेव्हलपर म्हणून काम करीत आहे.पत्नी प्रियांकाही डी.एड शिकली आहे. दोन मुला समवेत राहात असलेला सचिन बक्षीसाच्या रकमेतुन स्वतःचे हक्काचे घर बांधणार आहे. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा मार्ग सुटला असून पत्नीसाठी व्यवसाय उभा करणार असल्याचे सचिनने सा. गहिनीनाथशी बोलताना सांगितले.