भुदरगड तालुक्यातील म्हसवे-गारगोटी बंधार्‍याची दुरावस्था

भिंतीला तडे गेल्याने जलगळती आणि अपघाताची भीती

गारगोटी: एकेकाळी मिंचे खोऱ्यासह अनेक गावांना वरदान ठरलेला भुदरगड तालुक्यातील म्हसवे-गारगोटी मार्गावरील कोल्हापूर पद्धतीचा (K.P.) बंधारा सध्या अत्यंत धोकादायक बनला आहे. गेल्या ४० वर्षांपूर्वी वेदगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याची योग्य देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे हा बंधारा आता ‘अखेरची घटका’ मोजत असल्याचे चित्र आहे.

Advertisements

या बंधाऱ्याला दोन्ही बाजूने मोठी भगदाडे पडली असून, मुख्य भिंतीला गळतीचे तडे गेले आहेत. तसेच बंधाऱ्याचा पाया आणि संरक्षक भिंतही हळूहळू खचू लागली आहे. भिंतीलगत वाढलेली छोटी-मोठी झाडे-झुडपे या बंधाऱ्याच्या अस्तित्वाला अधिकच धोका निर्माण करत आहेत.

Advertisements

शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार?

हा बंधारा परिसरातील शेकडो एकर शेतीला पाणी पुरवण्यासाठी, गावांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आणि भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, भिंतीला गेलेल्या तड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जलगळती होण्याची भीती व्यक्त होत आहे. जर पाणी साठून राहिले नाही, तर आगामी काळात या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.

प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

सध्या या बंधाऱ्यावरून शालेय विद्यार्थी, नागरिक आणि इतर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. बंधारा कमकुवत झाल्याने येथे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दुर्घटना घडण्याची वाट न पाहता, तातडीने या बंधाऱ्याची पाहणी करून त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी आग्रही मागणी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!