कागल / प्रतिनिधी : लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये गेल्या पाच महिन्यापासून तरुण व तरुणी एकत्र कागल येथे राहत होते. तरुणास मुलगीची आई व बहिणीने वारंवार त्रास दिल्याने कागल तालुक्यातील व्हन्नूर येथील तरुणाने विषारी औषध घेतले. त्यात तो तरुण मयत झाला. आशितोष संजय लोंढे वय वर्ष 21 राहणार व्हन्नुर असे त्या मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद कागल पोलिसात झाली आहे.
या प्रकरणात सौ प्राजक्ता तानाजी खाडे वय 50 व तनवी तानाजी खाडे ,दोघीही राहणार व्हन्नुर तालुका कागल यांना कागल पोलिसांनी अटक केली आहे.
कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत आशुतोष व प्राजक्ता खाडे यांची मुलगी हे दोघेजण लिव्ह इन रिलेशनशिप नुसार कागल येथील पाझर तलावा जवळ तारीख 27/10/२०23 पासून ते २२/०३/२४ पर्यंत एकत्र राहत होते. आशुतोष लोंढे यास आरोपी सौ प्राजक्ता तानाजी खाडे व तनवी तानाजी खाडे या दोघींनी वारंवार मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून आशुतोष याने 22 मार्च 2024 रोजी रात्री दहा वाजता विषारी औषध घेतले. त्यास कोल्हापूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तो काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मयत झाला.
कागल पोलिसांनी मानसिक त्रास देणाऱ्या सौ प्राजक्ता खाडे व तनवी खाडे या दोघींना अटक केली आहे पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सुनिता शेळके या पुढील तपास करीत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी व्हुन्नूर गावास भेट देऊन पाहणी केली.