किल्ले पाहिल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज कळणार नाहीत : डॉ. अमर अडके


कागल : ‘छत्रपती श्री शिवाजी महाराजांना केवळ युद्ध आणि लष्कराच्या भूमिकेतून पाहू नका. त्यांना समजून घेण्यासाठी सह्याद्री समजून घ्या. किल्ले पाहिल्याशिवाय छत्रपती श्री शिवाजी महाराज कळणार नाहीत. इतिहासात भूगोल असतो आणि भूगोल कळल्याशिवाय इतिहासही कळत नाही,’ असे प्रतिपादन दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी केले.

Advertisements

स्वर्गीय जी. एन. जोशी जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त श्रीराम मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि सह्याद्री’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष शामराव पाटील होते.

Advertisements

डॉ. अडके म्हणाले, ‘जगण्याच्या वाटेवर हिमालयाएवढी उंची असलेली माणसे भेटत गेली आणि त्यांच्याकडूनच मी छत्रपती श्री शिवाजी महाराज शिकत गेलो. आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भूमीतले आहोत, हीच आपली ओळख आहे. पृथ्वीच्या पाठीवर पूर्ण पुरुष कोण असेल तर ते छत्रपती श्री शिवाजी महाराज होत.’
‘मातृभाषेची पहिली शुद्धी करण्याचे काम छत्रपती श्री शिवरायांनी केले.

इतिहास केवळ पुस्तकांत नसतो, तर तो गावांच्या वेशीतील पडलेल्या घरांमध्ये आणि सह्याद्रीच्या कडे-कपारीतही असतो. सह्याद्रीच्या कडे-कपारीत धारातीर्थी पडलेल्या अनेक मावळ्यांच्या समाध्या पाहिल्या. त्यांच्या त्यागाची उंची आपण गाठू शकणार नाही; मात्र त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे आपल्या हातात आहे,’ असे त्यांनी सांगितले.

Advertisements

यावेळी जन्मशताब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या इंग्रजी निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. प्रथम क्रमांक भूमी राहुल जाधव (सरलादेवी माने बॉईज अँड गर्ल्स स्कूल, कागल) हिला ५ हजार, द्वितीय सृष्टी महेशकुमार साळुंखे (श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल, कागल) हिला ३ हजार, तृतीय समन्यू गिरीश ठोंबरे (श्रद्धा पब्लिक स्कूल, कागल) याला २ हजार, तर उत्तेजनार्थ समीक्षा समीर पाटील (सिद्धनेर्ली विद्यालय) आणि हर्षवर्धन संजय मुर्तले (सरलादेवी माने बॉईज अँड गर्ल्स स्कूल, कागल) यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे पारितोषिक देण्यात आले.

Home » किल्ले पाहिल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज कळणार नाहीत : डॉ. अमर अडके

सर्व विजेत्यांना रोख रक्कमेसह प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. डॉ. अमर अडके यांचा सत्कार शामराव पाटील, तर सौ. अडके यांचा सत्कार कविता देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक प्रा. महावीर हातगिणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय नरेंद्र बोते यांनी करून दिला. स्पर्धेच्या परीक्षणाविषयी डॉ. ए. जी. जोशी यांनी माहिती दिली. विजय बोंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अतुल कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. राजश्री श्रीनिवास जोशी यांनी केले.

Leave a Comment

error: Content is protected !!