बातमी

लेखक चंद्रकांत माळवदे यांचा शिवगड ट्रस्ट तर्फे सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड-येथील ‘शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट’,च्या वतीने ‘गोवऱ्या आणि फुले ‘ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखक श्री चंद्रकांत माळवदे (सर ) यांचा, त्यांच्या पुस्तकास गारगोटी येथील ‘अक्षरसागर साहित्य मंच’तर्फे उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून पुरस्कार प्राप्त झाला, म्हणून ट्रस्टच्या वतीने त्यांचा विशेष यथोचित सत्कार शुक्रवार  (१ मार्च २०२४) रोजी ‘शिवगड ट्रस्ट’ च्या सभागृहामध्ये संपन्न झाला.

      श्री चंद्रकांत रामचंद्र माळवदे यांनी अतिशय कष्टातून यशस्वी इंग्रजी शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला. त्यांनी आपल्या कष्टप्रद जीवनाचा प्रवास ‘गोवऱ्या आणि फुले’ या आत्मचरित्रपर ग्रंथातून व्यक्त केलेला आहे. त्यांच्या या साहित्यकृतीस गारगोटी येथील ‘अक्षरसागर साहित्य मंच’ संस्थेच्या वतीने उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून गौरविण्यात आले. शिवगड आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे, प्रकाशित होणाऱ्या त्रैमासिक ‘भक्तीयोग’चे ते संपादक म्हणूनही त्यांनी  काही वर्षे जबाबदारी पार पाडली.

     या प्रसंगी,  “श्री चंद्रकांत माळवदे ( मुरगूड )  यांनी कष्टप्रद जीवन जगताना सचोटी कधीही सोडली नाही. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी एक शिक्षक, दै.’सकाळ’ चे, वीस वर्षे वार्ताहर आणि लेखक म्हणून यशस्वी वाटचाल चालू ठेवली”, असे गौरवोद्गार मंदाताई गंधे (अमरावती) यांनी काढले.

       श्री माळवदे यांनी आपल्या मनोगतामध्ये ,डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचे ,आपल्या जीवनातील योगदानाबद्दल  कृतज्ञता व्यक्त करुन, जीवनातील अडचणीच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांचे त्यांनी ऋण व्यक्त केले व ‘शिवगड परिवारा’ने सत्कार आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनय कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *