बातमी

जिल्ह्यातील प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी समन्वयाने काम करा – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

शुन्य ते पाच वयोगटातील बालके व गरोदर महिलांचे सर्व्हेक्षण व लसीकरणासाठी ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ मोहीम

कोल्हापूर, दि.18 :  ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील प्रत्येक बालकाचे लसीकरण होण्यासाठी सीपीआर, जिल्हा परिषद, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने परस्परांत समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.

            शून्य ते पाच वयोगटातील बालकांसाठी राबवण्यात येणाऱ्या ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ या लसीकरण मोहीमेची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे सर्वेक्षण आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत खरनारे, महानगरपालिकेचे प्रभारी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील एकूण बालके, सर्व्हेक्षणादरम्यान आढळून आलेली लसीकरणापासून वंचित बालके तसेच विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत दररोज लस देण्यात आलेली बालके व उर्वरित बालके आदी माहिती पोर्टलवर रोजच्या रोज अद्ययावत करावी. सर्व्हेक्षण मोहिमे अंतर्गत घरोघरी भेटी देवून बालके व गरोदर मातांच्या नोंदणीचे काम चोखपणे पार पाडावे. या कामी आशा, अंगणवाडी सेविका यांना योग्य त्या सूचना देवून त्यांचा सहभाग घ्यावा.

एखाद्या बालकाचा वेळापत्रकानुसार डोस घेणे बाकी असल्यास अशा बालकांचीही माहिती घेऊन त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करुन लसीकरण मोहिमेदरम्यान त्यांना लस देण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता आरोग्य विभागाने घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी आरोग्य विभागाला केल्या.

            ‘विशेष मिशन इंद्रधनुष’ मोहिमेअंतर्गत दि. 17 जुलै ते 25 जुलै दरम्यान घरोघरी सर्वेक्षण करुन लसीकरणापासून वंचित बालकांची व गरोदर मातांची माहिती घेवून नोंदणी करण्यात येणार आहे. तर दि. 7 ते 12 ऑगस्ट, दि. 11 ते 16 सप्टेंबर व दि.9 ते 14 ऑक्टोबर याकालावधीत लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. साळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *