क्लोरीन डोसर व टी सी एल मेडिक्लेअर यंत्रणा गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत
सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली ता. कागल येथील ग्रामपंचायतीने 15 व्या वित्त अयोगातून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक खर्च करून पाण्याच्या टाकीजवळ क्लोरीन डोसर व टी सी एल मेडिक्लेअर यंत्रणा बसवली होती. ही यंत्रणा गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत मोडकळीस येऊन पडली आहे. याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष करून 15 व्या वित्त आयोगाच्या लाखो रुपयांच्या निधीचा चुराडा केलेला आहे.
सिद्धनेर्ली गावाची लोकसंख्या पाहता कागल मूरगुड रोडच्या लगतच गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाक्या आहेत. या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाणी शुध्द करण्यासाठी टी सी एल पावडरचा वापर केला जातो. ही पावडर पाण्यात मिसळून ते पाणी टाकीमध्ये सोडले जाते.
ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाला त्रास नको म्हणून या पाण्याच्या टाक्या शेजारी 15 व वित्त आयोगाच्या निधीतून सुमारे 2 लाखापेक्षा जास्त निधी खर्च करून क्लोरीन डोसर व टी सी एल मेडिक्लेअर यंत्रणा बसवली होती.मात्र काही महिन्यातच ही यंत्रणा बंद पडली.त्यानंतर त्या यंत्रणेकडे ग्रामपंचायत ने साफ दुर्लक्ष केले आहे असे दिसून येत आहे.
सध्या गावामध्ये नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून फिल्टर हाऊसची सोय करण्यात येत आहे.मात्र अद्याप ही सुविधा उपलब्ध झाली नसताना लाखो रुपये खर्च केलेल्या या यंत्रणकडे ग्रामपंचायत ने साफ दुर्लक्ष केलेलं दिसून येत आहे.या यंत्रणेची नेमकी गरज होती का ? आणि असेल तर ह्याकडे का लक्ष दिले जात नाही असा सवाल पुढे येत आहे.
सदर यंत्रणा कोणी बसवली, त्यासाठी किती लोकांनी आपले टेंडर भरले , ही यंत्रणा बसवल्या नंतर त्याची देखभाल कोण करणार असे अनेक प्रश्न समोर येऊ लागले आहेत. लाखो रुपये खर्च करून उभारलेली यंत्रणा सध्या मात्र बंद अवस्थेत धूळ खात पडून आहे.