कागल (प्रतिनिधी) : कागल शहरात ‘आम्ही भारतीय लोक’ या संघटनेच्या वतीने निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांच्या संगनमताने होणाऱ्या ‘मतचोरी’ विरोधात एक भव्य ‘मतदार जागृती रॅली’ काढण्यात आली. ही रॅली शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाऊन परत गैबी चौकात तिचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित नेहरू, क्रांतिसिंह नाना पाटील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आदी महापुरुषांचे फोटो हातात घेऊन निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा निषेध केला.

यावेळी वक्त्यांनी, निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असूनही ती निवडणुका खुल्या आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी गंभीर नाही, अशी टीका केली. ईव्हीएम हा मतचोरीचा एकमेव मार्ग नसून इतरही अनेक मार्गांनी मतदारांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. नागरिकांचा मताधिकार हिरावून घेतला जाणे ही लोकशाहीची हत्या आहे, असे मत वक्त्यांनी मांडले.
या विरोधात आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेचा निषेध म्हणून ही रॅली काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. गैबी चौकात झालेल्या सभेत इंद्रजीत घाटगे यांनी प्रास्ताविक केले. ईगल प्रभाकर, कॉम्रेड शिवाजी मगदूम, अँड. सूर्याजी पोटले, राज कांबळे आदींनी आपले विचार मांडले.
यावेळी सज्जन पवार, अँड. रुपेश वाघमारे, सचिन घोरपडे, बाळासाहेब कागलकर, नितीन काळभोर, बाबू मेटकर, शकील जमादार, हिदायक नायकवडी, सुशांत कालेकर, नाना बरकाळे, फिरोज चाऊस यांच्यासह महिला कार्यकर्त्या सौ. वाघमारे, सौ. बने, सौ. पाटील, सौ. शिरोळे तसेच कागल आणि निपाणी परिसरातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.