सफाई कर्मचारी आणि घंटागाडी चालक यांना दिली सुट्टी
कागल : 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती निमित्त व ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सफाई कर्मचारी आणि कचरा उठाव वाहनचालक यांना सुट्टी देत त्यांच्या ऐवजी कागल नगरपरिषदेच्या घंटागाडीवर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाहन चालक म्हणून काम करत कचरा उठाव व सफाईचे काम करीत सेवा बजावली. या उपक्रमाचे आणि कागल नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या अभियानामध्ये नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबत नगरपालिका शाळेचे विद्यार्थी व एस.एल.एफ संस्था सदस्य सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत 2 ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेत कागल येथील शाहू कॉलनी, यशिला पार्क, जयसिंगराव पार्क, श्रमिक वसाहत, बेघर वसाहत, काळम्मावाडी वसाहत, गणेश नगर, शिवाजीनगर, सोमवार पेठ, हणबर गल्ली, सुभाष चौक, सणगर गल्ली, धनगर गल्ली, आझाद चौक, कोष्टी गल्ली, आंबेडकर नगर, मातंग वसाहत, फुले वसाहत, गहिनीनाथ नगर, अनंत रोटो, आंबिल कट्टी, कल्याणी पार्क या ठिकाणी नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साफसफाई केली व कचरा उठाव केला. तसेच लक्ष्मी टेकडी परिसर, मेन रोड, मुख्य बस स्थानक परिसर येथे साफसफाई अभियान राबवण्यात आले.
या अभियानामध्ये परिसराची साफसफाई करणे, प्लास्टिक संकलन करणे, संकलित केलेला कचरा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरणे आदी कामे करण्यात आली. यावेळी कागल नगरपरिषदच्या सफाई कर्मचारी व कचरा उठाव घंटागाडी वाहन चालक यांच्या ऐवजी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी साफसफाई व कचरा उठावचे काम केले. यामध्ये कागल नगरपरिषदचे मुख्याधिकारी अजय पाटणकर, स्वच्छता निरीक्षक नितीन कांबळे, दस्तगीर पखाली, बांधकाम विभाग प्रमुख सुनील माळी, जल अभियंता विजय पाटील, सुरेश रेळेकर, रूपेश सोनुले, निशांत जाधव, सुनील कासोटे, पॉल सोनुले यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.