७ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर (सलीम शेख ) : इचलकरंजी आणि कागल परिसरात घरफोडी व चोरीचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूरच्या पथकाने अटक केली आहे. या आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्यांच्या अटकेमुळे दोन घरफोडी व एक मोटरसायकल चोरी असे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
दिनांक १० जुलै २०२५ रोजी सकाळी कागल शहरातील माळी गल्ली येथे फिर्यादी सचिन अशोकराव पाटील यांच्या बंद घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी ५ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले होते. याप्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने पुढे नेला. तपासादरम्यान, हा गुन्हा इचलकरंजी येथील सराईत गुन्हेगार विनायक कुंभार (वय २९, रा. इचलकरंजी) आणि दिपक चंद्रकांत कांबळे (वय ३५, रा. इचलकरंजी) यांनी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ सापळा रचून १६ जुलै रोजी आवळे मैदान चौक, इचलकरंजी येथे या दोघांना अटक केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींनी कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी कागल शहरातील आणखी एका घरफोडीचा गुन्हा आणि माणिकपूर, मीरा भाईंदर, मुंबई येथील मोटरसायकल चोरीची देखील कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल:
* सोन्याचे दागिने
* चांदीचे दागिने
* चोरीची पल्सर मोटरसायकल
* एकूण किंमत: ७,००,००० रुपये
विशेष म्हणजे, अटक केलेला दिपक कांबळे याच्यावर यापूर्वी इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, हातकणंगले पोलिस ठाण्यांत १२ गुन्हे दाखल आहेत, तर विनायक कुंभार याच्यावर इचलकरंजी, शिवाजीनगर, शहापूर, गांधीनगर येथे २० घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, तसेच पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील, सागर माने, विशाल चौगले, विजय इंगळे, संदिप बेंद्रे, रोहित मर्दाने, अशोक पोवार, लखनसिंह पाटील, संजय कुंभार, संजय हुंबे, सागर चौगले, युवराज पाटील, शुभम संकपाळ, हंबीरराव अतिग्रे, राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.