कागल येथील २०१९ मधील घटना
कागल : कागल येथे २०१९ मध्ये झालेल्या मित्राच्या खुनाबद्दल न्यायालयाने आज दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सिद्धेश कुशनचंद चव्हाण (वय २९, रेल्वेलाइन, ठाकरे चौक, कागल) आणि वैभव अमरसिंग रजपूत (२६, जुनी बस्तीगल्ली, कागल, अशी त्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी हा निकाल दिला. यामधील आणखी एक संशयित अल्पवयीन असल्यामुळे दोघांच्या विरोधातच दोषारोपपत्र दाखल केले होते.
याबाबत सरकारी वकील मंजूषा पाटील यांनी सांगितले, की आठ जून २०१९ ला मृत सूरज नंदकुमार घाटगे (वय २४) दुपारी घरी झोपला होता. त्या वेळी त्याने मोबाइल कॉल स्वीकारले नाहीत. सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकीवरून दोन मित्र त्याला बोलविण्यासाठी आले. त्या वेळी फिर्यादीची आई सुरेखा नंदकुमार घाटगे आणि सूरज दोघे घराच्या दारात आले. तेथून सूरज मित्रांसोबत गेला. काही वेळाने तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती सुरेखा घाटगे आणि त्याच्या बहिणीला स्थानिकांनी दिली. घटनास्थळावरून मृतदेह ‘सीपीआर’मध्ये नेण्यात.
आला. यानंतर त्याच्यावर वार होऊन खून झाल्याची माहिती ‘सीपीआर’मध्ये पुढे आली. यानंतर आई सुरेखाने कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या गुन्ह्यात एकूण तीन संशयित होते. त्यापैकी एक अल्पवयीन असल्यामुळे दोघांवरच दोषारोपपत्र दाखल झाले. न्यायालयात सरकारी वकील पाटील यांनी पंधरा साक्षीदार तपासले. यामध्ये महत्त्वाचे काही ‘जण फितूर झाले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुनाथ दळवी, पंच साक्षीदार अनंतकुमार खोत, तलाठी संजय सुतार, अरुण हणवते यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. फितूर झालेल्यांकडून उलट तपासात काही गोष्टी पुढे आल्या.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पी. पी. पुजारी यांनी तपास केला. त्यांना हेडकॉन्स्टेबल श्रीमती मीनाक्षी शिंदे, सुरेश गुरव यांचे सहकार्य लाभले. विशेष म्हणजे या कामी नेमका खून कोणत्या कारणासाठी केला, हे गोपनीय ठेवले असून किरकोळ कारण असल्याचे सांगण्यात आल्याचे अॅड. पाटील यांनी सांगितले.