पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : पिंपळगाव खुर्द ता कागल येथील असणारा पाझर तलावाला मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे आल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. बंधाऱ्यावर बाभळ, उंबर, कडूनिब सारख्या झाडाची मोठी वाढ झालेली आहे याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर बंधाऱ्याला याचा फटका बसणार आहे. भविष्यात बंधारा फुटण्याची ही शक्यता आहे.
सध्या या तलावाकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे तलावाच्या पाण्यामध्ये व बंधाऱ्यावर गारवेल सारख्या वनस्पतीने अतिक्रमण केले आहे. बंधाऱ्यावर मोठमोठी झाडे वाढल्यामुळे तलावाच्या बंधाऱ्याला धोका निर्माण झाला आहे. या बंधाऱ्याचे दगड धुणे धुण्यासाठी काढून घेतले जात असल्यामुळे बंधारा मोडकळीस आला आहे. गेल्या 2 ते 3 महिन्या पाठीमागे साडव्याची भिंत देखील अज्ञात व्यक्तीनी फोडली आहे. अद्याप त्याकडे ही लक्ष दिलेले नसल्याचे समोर आले आहे.
पावसाळ्यामध्ये डोंगराळ भागातून येणारे लहान-मोठे ओढे तसेच डाव्या कालव्यातून येणारे पावसाळ्यातील पाणी याच्या साहाय्याने अवघ्या आठच दिवसांत भरणारे हे तलाव वर्षभर तग धरून राहते. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिंपळगाव वासीयांना म्हणावी तेवढी पाणीटंचाई जाणवत नाही. एप्रिल-मेच्या दरम्यान पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. हे जलस्रोत बळकट केले तर नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही.
तलाव बांधण्यात आला पासून एक वेळ वगळता गावकऱ्यांची साथ या तलाव्याने कधी सोडलेली नाही. उन्हाळ्यातही पुरेसे पाणी उपलब्ध झाल्यामुळे जनावरे, धुणे, पाणी तसेच इतर कामासाठीही तलावातील या पाण्याचा वापर केला जातो. तलावाच्या बांधकामानंतर या तलावाची एकदाही दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने तलावाच्या डागडुजीसाठी निधी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या तलावाची वेळीच डागडुजी होणे गरजेचे आहे.