” २८हजाराहून अधिक भाविकानी महाप्रसादाचा घेतला लाभ “
मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ( ता. कागल ) येथील जागृत देवस्थान श्री. अंबाबाई देवालयाचा वास्तुशांती, कलशारोहण, प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून २८ हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं’ चा जयघोष करत भाविक भक्तांनी श्री. अंबाबाईचा आशीर्वाद घेतला. पारंपारिक वाद्यांच्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत २३ जानेवारी ते २८ जानेवारी अखेर अनेक कार्यक्रम धार्मिक वातावरणात संपन्न झाले. सकाळी १० वाजता -रिंगण सोहळा पार पडला त्यामुळे मुरगूडवासीय भक्तीमय रंगात रमून गेले.
सोळा वर्षानंतर लोकसहभाग व शासनाकडून मिळालेल्या निधीच्या माध्यमातून भव्य असे हेमाडपंथी संपूर्ण दगडी बांधकाम असलेले अंबाबाई मंदिर उभे केले आहे. राजकीय मतभेद बाजूला सारून सर्व मुरगूडवासीयांनी गेले पाच दिवस एकोप्याचे दर्शन घडविले. दारी गुढ्या उभारून आणि दारात सडा रांगोळ्यां काढुन व स्वागत कमानीं उभारून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. यामुळे भक्तीमय वातावरण परिसरात निर्माण झाले होते.
मुरगूड शहरामध्ये उभ्या करण्यात आलेल्या स्वागत कामानीमुळे शहराचं रूपडच बदलून गेले. महाप्रसादादिवशी करण्यात आलेली वाहतूक व्यवस्था स्तुत्य होती. त्यामुळे मंदिर परिसरात व महाप्रसाद ठिकाणी गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले नाही. स्वयंसेवक शिस्तबद्धरित्या , नियोजनबद्धआपलं काम करत होते.
महाप्रसादासाठी अनेक लोकांनी आपापल्या परीने हातभार लावला होता. भक्तांना स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी बिसलरी पाण्याची सोय करण्यात आली होती. महाप्रसाद घेणारा भक्त आपली जेवलेली पत्रावळी स्वतः उचलून कचराकुंडीत किंवा उभ्या केलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये टाकत होता. त्यामुळे परिसरातील स्वच्छता कायम राहिली. अतिशय नियोजन, शिस्तबद्ध, नीटनेटक्या नियोजनामुळे संपूर्ण यात्रा सुरळीत पार पडली.